शैलजा तिवले

स्टिरॉइड, टोसिलिझुमॅब, रेमडेसिवीर या औषधांचा करोना उपचारात योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर न केल्याने रुग्णांना अन्य जीवणूजन्य संसर्गाचा धोका निर्माण होत असल्याची निरीक्षणे तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदविली आहेत.

करोना उपचारात स्टिरॉइडचा वापर केला जातो. याचे प्रमाण मार्गदर्शक तत्त्वामध्ये नमूद केले आहे. परंतु अनेक ठिकाणी यापेक्षा उच्च मात्रेत दिले जाते. तसेच याचा वापर केव्हा करावा हेही स्पष्ट केले आहे. मात्र तरीही काही ठिकाणी त्या आधीच याचा वापर केल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्ण संसर्गातून बरा झाला तरी उच्च मात्रेतील स्टिरॉइडमुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने न्यूमोनिया, अतिदक्षता विभागात अधिक काळ राहिल्याने होणारे अन्य जिवाणूजन्य संसर्गजन्य आजार झाल्याचे आढळते, अशी माहिती राज्य विशेष कृती दलाचे सदस्य आणि वोक्हार्ट रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ.केदार तोरस्कर यांनी दिली.

काही रुग्णांकरिता आवश्यकतेपेक्षा अधिक स्टिरॉइडचा वापर केल्याचे आढळले आहे. श्वसनाच्या आजारामध्ये उच्च मात्रेतील स्टिरॉइडचा वापर केला जातो. करोना संसर्गामध्ये मिथाइलप्रेड्नीसोलोन किंवा डेक्सामिथासोन यापैकी कोणत्याही स्टिरॉइडचा वापर हा कमीत कमी मात्रेत करणे गरजेचे आहे. अर्थात केवळ स्टिरॉइडच्या वापरामुळेच अन्य संसर्ग होत आहेत, असे म्हणता येणार नाही. मधुमेहाचे तीव्र प्रमाण, रेमडेसिवीर, टोसिलिझुमॅबसारखी औषधांचा अतिरिक्त वापर यांमुळेही रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होऊन अन्य प्रकारच्या संसर्गाची बाधा होण्याची शक्यता असते, असे कृती दलाचे सदस्य डॉ.राहुल पंडित यांनी सांगितले.

‘टोसिलिझुमॅब हे औषध सायटोकाइन स्टॉर्म असल्यानंतरच देण्याचे सूचित केले आहे. छोटय़ा रुग्णालयांमध्ये रुग्णाच्या स्थितीवरून योग्य निष्कर्ष काढणे आणि औषधाबाबत निर्णय घेणे प्रत्येक वेळी अचूकपणे होतेच असे नाही. मी तीन रुग्णालयांमध्ये उपचार देतो. तिथे एखाद्या गंभीर रुग्णाला काय उपचार द्यावेत याची चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांची उपलब्धता नसते. त्यामुळे मीच रुग्णाला तपासतो. उपचार पद्धती ठरवतो आणि निघून येतो. अन्य वेळी फोनवरून मार्गदर्शन सुरू असते. त्यामुळे प्रत्येक छोटय़ा रुग्णालयामध्ये वैद्यकीय स्थितीचे अचूक निदान करण्याची क्षमता समान नाही, हेही विचारात घ्यायला हवे,’ असे मत उपनगरीय रुग्णालयातील एका श्वसनविकारतज्ज्ञांनी व्यक्त केले.

राज्य विशेष कृती दलाच्या माध्यमातून रुग्णाला धोका पोहचेल अशा कोणत्या बाबी करू नका, यावर सध्या भर दिला जात असल्याचे डॉ. तोरस्कर यांनी नमूद केले. रुग्ण श्वसनयंत्रणेवर जाऊ नये म्हणूनही काही वेळेस या औषधांच्या वापरावर भर दिला जातो. परंतु याचे दुष्परिणाम होऊन अन्य संसर्गजन्य आजारांनी मृत्यू झाल्याचे आढळल्याचे डॉक्टरांनी नोंदविले आहे. विषाणूप्रतिबंधक (अँटीव्हायरल) म्हणून दिले जाणाऱ्या रेमडेसिवीरचा वापर संसर्गाचा पहिल्या काही टप्पात करणे गरजेचे आहे. टोसिलिझुमॅब शक्यतो एकदाच दिले जावे. अगदीच आवश्यकता असल्यास दुसऱ्यांदा दिले जाते. परंतु काही रुग्णामध्ये याहूनही अधिक वेळ दिल्याचा अनुभव डॉक्टरांनी व्यक्त केला.

‘टोसिलीझुमॅब’बाबत..

टोसिलीझुमॅब औषधावरील ‘रोश’ या उत्पादक कंपनीची पहिली वैद्यकीय चाचणी ‘कोवाक्टा’मध्ये हे औषध करोना उपचारासाठी विशेष गुणकारी नसल्याचे आढळले आहे. राज्यभरातील रुग्णालयांमध्ये सध्या या औषधाचा तुटवडा आहे.  करोनाबाधितांच्या उपचाराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (आयसीएमआर) आणि राज्याच्या विशेष कृती दलाला आहेत. तेव्हा या औषधाच्या वापराबाबत आवश्यक ते बदल करावेत आणि आम्हाला सूचित करावे, असा आदेश राज्य विशेष कृती दलाला बुधवारी दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

संसर्गानेच मृत्यू

पहिल्या आठवडय़ात होणारे करोनाबधितांचे मृत्यू हे अधिकतर करोना संसर्गामुळे होतो. परंतु दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात होणारे मृत्यू हे इतर संसर्गामुळे होण्याची शक्यता अधिक असते असेही तज्ज्ञांनी सांगितले.

लाभापेक्षा तोटय़ाची शक्यता

या औषधांचा वारेमाप वापर केला जात असल्याने रुग्णाला फायदा होण्याऐवजी त्याच्या दुष्परिणामामुळे धोके वाढण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा यांचा वापर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ.अविनाश सुपे यांनी सांगितले.