सातत्याने बदलत जाणाऱ्या हवामानामुळे मुंबई आणि उपनगरात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाच, स्वाइन फ्लूनेही धोक्याची घंटा वाजविण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या तीन दिवसांत स्वाइन फ्लूच्या तब्बल १४० नवीन रुग्णांची भर पडली आहे. यादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून ऑगस्टमधील मृतांची संख्या १४ वर गेली आहे.  सध्याच्या ऊन आणि पावसाच्या विचित्र चक्रात स्वाइन फ्लू आणखी घातक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.  ऑगस्टमध्ये निदान झालेल्या ३७ रुग्णांमागे एकाचा मृत्यू झाला असून, जूनपर्यंत हे प्रमाण १०० व्यक्तींमागे एक मृत्यू होते.
फेब्रुवारीमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची साथ आली होती तेव्हा काही काळ रुग्णांची प्रति दिवसाची संख्या चाळीसहून अधिक झाली होती. मात्र जूननंतरच्या साथीमध्ये रोज सरासरी दहा नवीन रुग्णांची नोंद सुरू होती. जूनमध्ये १९, जुलैमध्ये १८४ स्वाइन फ्लू रुग्ण आढळले. मात्र ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. आतापर्यंत ५१९ रुग्णांची नोंद झाली असून त्यातील १२१ रुग्ण २१ ते २४ ऑगस्टदरम्यान आढळले आहेत. या तीन दिवसांत दोघांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. यातील एक दहिसर येथील ५० वर्षांची महिला होती. मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास असलेल्या या महिलेला मालाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २० ऑगस्टपासून तिला ओसेल्टामिव्हीर देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पालिकेच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आले मात्र २२ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. सांताक्रूझ येथील २१ वर्षांच्या तरुणाचा स्वाइन फ्लूमुळे २३ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.
तीन जिल्ह्य़ांत ४२ मृत्यू
ठाणे, पालघर तसेच रायगड या तिन्ही जिल्ह्य़ांमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे ४२ जणांचा मृत्यू झाला. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी घेतलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही माहिती उघड झाली. गेल्या आठ महिन्यांत ठाणे शहरात २४३ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.
३७ रुग्णांमागे एक मृत्यू
ऑगस्टमध्ये आतापर्यंत स्वाइन फ्लूच्या ५१९ रुग्णांची नोंद झाली. यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ प्रत्येक ३७ रुग्णांमागे एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वृद्ध, दीर्घकाळ आजारी असलेल्या व्यक्ती तसेच लहान मुलांची संख्या जास्त आहे. जूनपर्यंत स्वाइन फ्लूचे १८२६ रुग्ण आढळले होते व त्यातील २१ रुग्णांचा मृत्यू झाला होता.