सुहास जोशी

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात स्थलांतरित मजुरांना वाहतूक मुभा देण्याचा निर्णय होऊन सात-आठ दिवस होत आले तरी रेल्वेची सुविधा उपलब्ध होत नसल्याने अस्वस्थ मजुरांनी ट्रक, टेम्पोने प्रवास करायची जोखीम घेतली आहे. लहान मुले, महिला, पुरुष असा सगळा गोतावळा एकाच टेम्पोमध्ये अत्यंत दाटीवाटीने प्रवास करत आहे. त्यातील काहीजणांना वाटेतील नाकाबंदीवरून किंवा इगतपुरीहून परतीचा मार्गदेखील पत्करावा लागत आहे. पायी चालत जाणारे मात्र आडवाटेने नाके पार करत पुढे जात आहेत.

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात खासगी बसने विशेष परवाना घेऊन प्रवासाची मुभा देण्यास सुरुवात झाली. मात्र हा खर्च मोठा असून, रेल्वेगाडीसाठी नंबर केव्हा लागणार या अस्वस्थतेपोटी अनेक मजुरांनी ट्रकच्या प्रवासाचा पर्याय स्वीकारला.

मुंबईच्या कानाकोपऱ्यांतून अनेक मजूर ठाण्यातील माजीवडा नाका, भिवंडी अशा ठिकाणी एकत्र येत असून तेथून वाहनाने प्रवास करताना दिसतात. तर काहीजण थेट मुंबईतूनच असा प्रवास सुरू करतात. विशेष परवाना असलेल्या खासगी बससाठी करावयाच्या निम्म्या खर्चात टेम्पोची सुविधा मिळत असल्याने हा पर्याय स्वीकारल्याचे अनेकांनी सांगितले. त्याचबरोबर प्रामुख्याने एकाच चाळीतील, वस्तीतील ५०-६० जणांचा समूह एकत्रपणे प्रवास करताना दिसत आहे.

रेल्वेसाठी कागदपत्रे जमा केल्यानंतर नंबर येण्यास किती वेळ लागेल याची अनिश्चितता असल्याने अनेकांनी टेम्पोला प्राधान्य दिल्याचे दिसते. तसेच खासगी बससाठी परवानगी मिळण्यास विलंब लागत असल्याने ट्रक अथवा टेम्पो हा पर्याय सोयीस्कर असल्याचे अनेकांनी सांगितले.

नाकाबंदीच्या ठिकाणी पोलीस अडवतील म्हणून अलीकडेच सर्व प्रवाशांना उतरवले जाते आणि रिकामी गाडी पुढे नेली जाते. मग प्रवासी पुढे चालत येऊन गाडीत जाऊन बसतात. या पद्धतीने काहींनी इगतपुरी गाठली आहे. जिल्ह्य़ाची हद्द ओलांडल्यावर या अडचणीत भर पडते. एकाच वाहनाने सलग प्रवास न करता काहीजण ठाणे/भिवंडी बायपास ते कसारा/इगतपुरी हा प्रवास ट्रक अथवा टेम्पोने करून पुढील टप्पा मिळेल त्या वाहनाने करत आहेत.

अंदाजे भाडे

* वाराणसी – दोन हजार रुपये

* गोरखपूर – तीन ते साडेतीन हजार रुपये

* आझमगड – तीन ते साडेतीन हजार रुपये

* पाटणा – तीन हजार रुपये

पायी जाणाऱ्यांची संख्या मोठी

ट्रक-टेम्पोचा पर्याय अनेकजण स्वीकारत असले तरी पायी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. संपूर्ण कसारा घाटात एका बाजूस फक्त स्थलांतरित मजुरांचीच रांग दिसून येते. नाकाबंदीच्या ठिकाणी ते रस्ता सोडून आडमार्गाने पुढे जातात. वाटेतील सर्व पेट्रोल पंपावर चालत जाणाऱ्यांची गर्दी मोठय़ा प्रमाणात दिसून येते.

पहिली श्रमिक रेल्वे रवाना

कामगारांसाठी मुंबईतून पहिली श्रमिक रेल्वेगाडी शुक्र वारी उत्तर प्रदेशला रवाना झाली. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून बस्ती स्थानकासाठी (उत्तर प्रदेश) सायंकाळी ६.१२ वाजता सुटली. यामध्ये १,१४३ प्रवासी होते. आतापर्यंत ठाणे, पनवेल, भिवंडी, वसईतूनही श्रमिक विशेष गाडय़ा सुटल्या आहेत. त्याआधी शुक्र वारी दुपारी अडीचच्या सुमारास कल्याणहून बिहारमधील अररिया कोर्टसाठी गाडी सोडली गेली होती. दिवसभरात अहमदनगरहून भोपाळसाठी आणि साईनगर शिर्डीहून उत्तर प्रदेशमधील सीतापूरसाठीही गाडी सोडण्यात आली.

परतीसाठी सायकल खरेदी

सायकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अनेकांनी चार-पाच हजार रुपये खर्च करून गेल्या दोन दिवसांत नव्या कोऱ्या सायकल खरेदी केल्या आहेत. पनवेलहून ५० जणांच्या समूहाने एकत्र सायकल खरेदी केल्या. ट्रक, टेम्पोतील गर्दीचा त्रास आणि अनिश्चितता यापेक्षा सायकल दामटवणे बरे अशीच त्यांची मानसिकता दिसली. रांची, गोरखपूर, मधुबनी, अलाहबाद या ठिकाणी जाणाऱ्या सायकलस्वारांची संख्या किमान ३००च्या आसपास होती. या सायकलस्वारांकडे सायकल दुरुस्तीचे मूलभूत साहित्य अगदीच मर्यादित प्रमाणात आहे.