दहिसर नदीच्या पुराने घराघरांत गाळ; सफाईचे काम चौथ्या दिवशीही सुरू

मुसळधार पावसाने बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशेजारी वाहणाऱ्या दहिसर नदीने अक्राळविक्राळ रूप धारण करत बोरिवली पूर्वेकडे नदीकिनारी वसलेल्या दौलत नगर झोपडपट्टी, श्रीकृष्ण नगर, शांतिवन आदी परिसराची चांगलीच वाताहत केली. नदीने  सीमा ओलांडत उद्यान परिसराबरोबरच या वसाहतींचेही मोठे आर्थिक नुकसान केले आहे. सलग चौथ्या दिवशी येथील घरांमध्ये पाण्याने आलेला गाळा साफ करण्याचे काम सुरू असून लोकांच्या हालांना पारावार राहिलेला नाही.

दौलत नगर परिसरातून वाहणाऱ्या दहिसर नदीने आजूबाजूच्या संजय गांधी नगर, हनुमान नगर झोपडीसह सात ते आठ रहिवासी इमारती व कर्नल औद्योगिक वसाहतीलाही आपल्या जोरदार प्रवाहाने फटकारले. संजय गांधी नगर परिसरातील सात ते आठ झोपडय़ांची यात पडझड झाली. येथील रहिवाशांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. सर्वच घरांमध्ये जवळपास पाच ते सहा फूट पाणी शिरल्याने सर्वच वस्तूंची नासाडी झाली आहे. इमारत परिसर व रस्ते पाण्यासोबत आलेल्या गाळांनी भरले आहेत. काही ठिकाणी वीज जोडणी बंद आहे. त्यामुळे रहिवाशांनी मंदिरात आसरा घेतला आहे. इतर रहिवाशी त्यांना जेवण, कपडे आणून देत आहेत. मात्र घरच पडल्याने किती दिवस इथे राहायचे अशा प्रश्न संजय नगरमधील पूरबाधित महिला लक्ष्मी कदम यांना पडला आहे. तर ‘गेल्या १७ वर्षांत २००५ आणि आता असे दोनदा आम्हाला नदीने झोडपले आहे. इमारतीत सहा फुटापर्यंत पाणी शिरले होते. जीवाच्या आकांताने आम्ही वरच्या मजल्यावर धाव घेतली. घरातील अन्नधान्य, कपडालत्ता अशा सर्वच सामानाची नासधूस झाली आहे. यातून पुन्हा उभे राहायला मोठा अवधी लागणार आहे,’ अशी पतिक्रिया योगिता इमारतीतील तळमजल्यावरील रहिवासी भारती दिनेश सुतार यांनी व्यक्त केली.

दौलत नगर येथील साईलीला इमारतीची संरक्षक भिंत तोडून पाणी आत शिरले. त्यामुळे रहिवाशांच्या वाहनांचे मोठेच नुकसान झाले आहे. येथील शिल्पर इमारतीतील देसाई या वयोवृद्ध दांपत्याच्या घरात पाणी शिरल्याने लाद्या उखडल्या आहेत. पाणी शिरायला सुरुवात झाल्यावर लोकांनी आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे आम्ही समोरच्या इमारतीत धाव घेतली. गेले काही दिवस दुसऱ्या इमारतीत वास्तव्याला आहोत, असे भास्कर देसाई यांनी सांगितले.

शांतिवनही पाण्याखाली

उद्यानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या श्रीकृष्णनगरमधील बंगल्यांमध्येही सात ते आठ फुटापर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे येथील सर्व रहिवाशींनी छतावर आसरा घेतला आहे. शांतीवन परिसरातील जवळपास पन्नासहून अधिक व्यावसायिक गाळ्यांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रस्ते व दुकाने आजही गाळाने भरलेले आहेत. सर्वत्र गाळ काढण्याचे काम सुरू आहे. शांतीवन परिसरातील जवळपास सहा बँकादेखील पाण्यात बुडाल्या असून तेथील कागदपत्रांचे, फर्निचरचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ‘मंगळवारी मी कामानिमित्त बाहेर होतो. आई-वडील व काका-काकू, पत्नी व मुले घरी होते. त्यामुळे माझ्या पत्नीने त्यांना घेऊन वरच्या मजल्यावर धाव घेतली. त्यामुळे ते बचावले,’ असे येथील रहिवासी आदित्य गुप्ते यांनी सांगितले. तर पाण्याच्या लाटेसोबत आलेला गाळ घरात साचला आहे. घरातील सर्वच वस्तू चिखलाने माखल्या आहेत. साफ करणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे अध्र्याहून अधिक वस्तू फेकावे लागल्याचे अरविंद गाडगीळ यांनी सांगितले.