तिकिटांचे दर जास्त असल्याचे प्रवाशांचे मत

मुंबई/अलिबाग : दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानच्या रो रो प्रवासी वाहतुकीला येत्या १५ दिवसात सुरू होणार असून ही सेवा पावसाळ्यातदेखील कार्यरत राहील. रो रो सेवेचे दरपत्रक महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मंजूर केले असून, हे दर चढे असल्याचे प्रवाशांचे मत आहे.

‘प्रोटोपोरोस’ ही रो रो बोट गेल्या आठवडय़ात १४ तारखेस मुंबईच्या समुद्रात दाखल झाली. बोटीच्या सीमा शुल्क संबंधित कागदपत्रांची पूर्तता शुक्रवापर्यंत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर जलयान म्हणून बोटीची नोंदणी संबधित यंत्रणेकडे करावी लागेल. त्यानंतर बोटीच्या चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच रो रो सेवेचे उद्घाटन केले जाईल.      उद्घाटनासाठी उच्चपदस्थांची उपलब्धता कशी आहे त्यावर तारीख ठरणार असली तरी ही सेवा फेब्रुवारीअखेपर्यंत सुरू करण्याचा मेरिटाईम बोर्डाचा मानस आहे.

सध्या मुंबई ते मांडवा दरम्यान उपलब्ध असलेली प्रवासी जलवाहतूक पावसाळ्यात बंद ठेवली जाते. पण रो रो सेवेची क्षमता पावसाळ्यातदेखील वाहतूक करण्याची आहे. त्यामुळे ‘प्रोटोपोरोस’ पावसाळ्यात सुरू असेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या काळात प्रवासी वहन मर्यादा अध्र्यावर (५०० प्रवासी) आणली जाईल. पावसाळ्यात उधाणाच्या भरतीवेळी, मोठय़ा लाटा उसळत असताना मात्र रो रो सेवा बंद राहील. या काळात समुद्र शांत असताना वाहतूक सुरू ठेवली जाईल. पावसाळावगळता या बोटीची क्षमता एक हजार प्रवासी आणि १८० वाहने असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. तसेच यामधून बसगाडीची वाहतूक करण्याचीदेखील सुविधा आहे. मात्र त्याबदल्यात चारचाकी वाहने कमी केली जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान प्रवासी वाहतुकीचे दरपत्रक महाराष्ट्र मेरिटाईमच्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले आहे. मात्र वाहनासहित प्रवास करताना हे दर चढे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सेवा सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांच्या काळात या दरपत्रकाची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर त्यात काही बदल करायचे असतील तर त्यावर स्वतंत्रपणे, नियमानुसार विचार केला जाईल.

वाहनांचा वाहतूक खर्च दुप्पट 

अलिबाग ते मुंबई हे अंतर रस्ता मार्गाने ९६ किलोमीटर इतके आहे. हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे तीन ते साडे तीन तासाचा कालावधी लागतो. पेट्रोलवर चालणाऱ्या खासगी वाहनाने जाऊन येऊन साधारणपणे दीड हजार रुपये खर्च येतो, डिझेलवर चालणाऱ्या वाहनाने एक हजार ते १२०० रुपये लागतात. रो रो सेवेसाठी माडंव्याहून मुंबईत जाण्यासाठी एका वेळेला सुमारे ११०० ते १५४० रुपये मोजावे लागतील, दोन्ही बाजूने प्रवास केल्यास हा खर्च २२०० ते ३०८० रुपये होईल. म्हणजेच रो रो सेवा वापरण्यासाठी जवळपास दुप्पट खर्च वाहनचालकांना सोसावा लागेल. त्यामुळे नियमित मुंबईत जाणाऱ्या वाहनचालकांना हा वाहतूक खर्च परवडणार नाही.

मांडवा ते गेट वे दरम्यान चालणाऱ्या जलवाहतुकीसाठी सध्या १२५ ते १९० रुपये तिकीट दर आकारला जातो, तर रो रो सेवेसाठी २२० ते ५५० असा दर आकारला जाणार आहे. त्यामुळे इतर जलवाहतूक कंपन्यांच्या तुलनेत रो रो सेवेचे दर हे जास्त असणार आहेत. हे तिकिटाचे दर कमी केले तर रो रो सेवेला प्रतिसाद चांगला प्रतिसाद मिळू शकेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.