News Flash

प्रवाशांच्या जिवाशी खेळ

मुंबईतील २० हजार व्यावसायिक वाहने योग्यता प्रमाणपत्राविना

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| सुशांत मोरे

मुंबईतील २० हजार व्यावसायिक वाहने योग्यता प्रमाणपत्राविना

वाहन चालविण्यासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी करणारी मुंबईतील परिवहन विभागाची व्यवस्थाच गेले काही महिने ठप्प असल्याने तब्बल २० हजारांहून अधिक व्यावसायिक वाहने वहन योग्यता प्रमाणपत्राविनाच रस्त्यांवर धावत आहेत. यात रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट, रुग्णवाहिका यांसह अन्य व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. तपासणी होत नसल्याने पादचाऱ्यांच्या जिवाशी खेळ होतोच. शिवाय वहन योग्यता प्रमाणपत्र नसल्याने वाहनचालकाला भविष्यात अपघात विमा मंजूर होण्यासही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ही व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका यांसह अन्य व्यावसायिक वाहनांनी आरटीओकडून वार्षिक वहन योग्यता तपासणी (फिटनेस) करून घेणे आवश्यक आहे. मुंबईतील सर्व आरटीओत मिळून दररोज जुन्या १,५०० तर नवीन ४०० ते ५०० वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासणी केली जाते. त्यासाठी प्रत्येक आरटीओत २५० मीटरचा चाचणी ट्रॅक असावा लागतो. मात्र

मुंबईसह राज्यभरात अनेक

ठिकाणी ट्रॅक नसल्याने हे प्रमाणपत्र देणारी यंत्रणा सक्षम करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ट्रॅक चाचणीशिवाय दिले गेलेले प्रमाणपत्र हा फक्त फार्स असून हा रहिवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही ट्रॅककरिता जागा उपलब्ध करून देण्यात परिवहन विभागाला अपयश आल्याने न्यायालयाने प्रमाणपत्र देण्याच्या कामालाच स्थागिती दिली. त्यामुळे २९ सप्टेंबरपासून वाहनांची तपासणी थांबलेली आहे.

परिणामी सुमारे २० हजार जुनी व नवीन व्यावसायिक वाहने या तपासणीविना आहेत. प्रमाणपत्र नसल्याने वाहन खरेतर रस्त्यावर उतरविता येत नाही. यातील १५ हजार जुनी वाहने प्रमाणपत्राविना धावत असल्याची शक्यता खुद्द परिवहन विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.

नवीन व्यावसायिक वाहनांना दोन वर्षांनी, तर जुन्या वाहनांना एक वर्षांनंतर योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) घेणे आवश्यक असते. अन्यथा आरटीओकडून कारवाईचा बडगा उचलला जातो. मुंबईत तपासणीकरिता ट्रॅक उपलब्ध करून देण्यात पुरेशा जागेअभावी अडचणी येत आहेत. त्यामुळे २९ सप्टेंबरपासून मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरीवली आरटीओतील वाहनांची चाचणी घेऊन वहन योग्यता प्रमाणपत्र देण्याचे काम थांबलेले आहे.

पूर्वी नवीन वाहनांना वहन योग्यता प्रमाणपत्र त्या त्या वाहन विक्री करणाऱ्या कंपनीकडूनच उपलब्ध करून दिले जात असे. परंतु न्यायालयाने नव्या वाहनांसाठीही प्रमाणपत्र देण्याच्या सूचना आरटीओला केल्या आहेत. नवीन गाडय़ांना नंबरही उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे वाहन मालक वैतागले आहेत. मुंबईत वहन योग्यता प्रमाणपत्राशिवाय उभ्या असलेल्या गाडय़ांमध्ये रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, अग्निशमन दल, बेस्ट बस, रुग्णवाहिका यांसह अन्य व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. चाचणी मार्ग उपलब्ध न झाल्यास यात वाढ होण्याची शक्यताही आहे. मुंबईतील वाहनांना ठाणे, पनवेल, नवी मुंबईत चाचणी करता येणार आहे. परंतु, तिथे चाचणी करणे गैरसोयीचे ठरत असल्याचे वाहनमालकांचे म्हणणे आहे.

चाचणी मार्गाचे घोडे अडले कुठे?

वडाळा आरटीओला चाचणी मार्गासाठी देवनार आगारातील जागा बेस्टने भाडेतत्त्वावर देऊ केली आहे. परंतु हा ट्रॅक होण्याकरिता सात ते आठ महिने लागतील. ताडदेव आरटीओच्या आवारात १५० मीटर जागा उपलब्ध आहे. याच परिसरात एक बॅरेक असून ती तोडून २५० मीटरची जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. तर अंधेरी आरटीओच्या जागेतच एसआरए प्रकल्प राबविला जात आहे. तेथेच मिळणाऱ्या जागेत टेस्ट ट्रॅक बांधण्याचा विचार सुरू आहे. तर बोरीवली आरटीओकडूनही जागेचा शोध होत आहे. त्यामुळे किमान पुढील सहा महिन्यांत तरी ट्रॅक उपलब्ध होणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबईत लवकरात लवकर टेस्ट ट्रॅक उपलब्ध व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तोपर्यंत मुंबईतील वाहनांची चाचणी पनवेल, वाशी, ठाणे आरटीओत करण्यात येत आहे. त्यामुळे वाहन मालकांनी तेथे जावे.   सतीश सहस्रबुद्धे, अपर परिवहन आयुक्त

ज्या वाहनांना वहन योग्यता प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू नये, अशी आमची मागणी आहे. मुंबईतील वाहन चालकांना ठाणे, पनवेल, वाशी येथे जाणे अशक्य आहे.   शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा

टॅक्सीमेन्स युनियन स्कूल बसनाही योग्यता प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत आहेत. परिवहनकडे तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या मुंबईबाहेर चाचणीसाठी जागा उपलब्ध केली असून एवढय़ा लांब जाणार कसे, असा प्रश्न आहे.    अनिल गर्ग, अध्यक्ष (महाराष्ट्र) स्कूल बस ओनर्स असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:02 am

Web Title: road accident in mumbai 3
Next Stories
1 औषध खरेदीचा वेग वाढविण्याचे हाफकिन महामंडळाला आदेश!
2 पालिकेचा स्वच्छतेचा दावा फोल
3 ‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत
Just Now!
X