News Flash

अपघातग्रस्तांना ‘जीवनदूतां’ची मदत

अपघाताच्या ठिकाणी तात्काळ मदत वा प्रथमोपचार न मिळाल्याने अपघातग्रस्तांना प्राणास मुकावे लागते.

पालिका कर्मचारी, वाहतूक पोलीस, नामांकित डॉक्टरांचा समावेश

मुंबईतील महत्त्वाच्या अपघातप्रवण ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी पालिका, वाहतूक पोलीस आणि नामांकित डॉक्टरांचा सहभाग असलेले ‘जीवनदूत’ मुंबईकरांच्या मदतीला धावून येणार आहेत.

अपघाताच्या ठिकाणी तात्काळ मदत वा प्रथमोपचार न मिळाल्याने अपघातग्रस्तांना प्राणास मुकावे लागते. कायद्याची भीती, पोलीस ठाण्याच्या वाऱ्या टाळण्यासाठी नागरिक अपघातग्रस्तांना मदत करण्यास राजी नसतात. नागरिकांमधील ही मानसिकता बदलण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी म्हणून अपघातप्रवण रस्त्यांवर ‘जीवनदूत’ तैनात करण्याचा संकल्प ‘युनायटेड वे मुंबई’ने सोडला असून ‘जीवनदूतां’ची निवड आणि प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईच्या लोकसंख्येत झपाटय़ाने वाढ झाली असून वाहनसंख्याही प्रचंड वाढली आहे. दहिसर आणि मुलुंडच्या पलीकडून कामानिमित्त मोठय़ा संख्येने नागरिक आपल्या वाहनाने मुंबईत येत असतात. त्यामुळे वाहतुकीवर ताण येतो. मात्र मुंबईतील रस्त्यांचा त्या तुलनेत विस्तार होऊ शकलेला नाही. वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, बेशिस्तपणे वाहन हाकणारे वाहनचालक आणि वाहतुकीकडे गांभीर्याने लक्ष न देता रस्त्यावरून चालणारे प्रवाशी अशा विविध कारणांमुळे मुंबईमध्ये अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. मुंबईतून पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधून जाणाऱ्या द्रुतगती महामार्गाचाही त्यात समावेश आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे काही रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहे. अशा काही ‘काळ्या ठिकाणां’ची (ब्लॅक स्पॉट) यादी वाहतूक पोलिसांनी तयार केली आहे.

अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला तात्काळ प्रथमोपचार मिळणे  गरजेचे असते. मात्र अपघातानंतर रस्त्यावर विव्हळत पडलेल्या जखमीला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून काढता पाय घेण्याची प्रवृत्ती नागरिकांमध्ये बळावली आहे. अपघातग्रस्त जखमीला मदत केल्यानंतर पोलीस ठाण्याच्या किंवा रुग्णालयाच्या वाऱ्या कराव्या लागतील अशी भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे जखमींना मदत करण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. परिणामी, वेळीच उपचार न मिळाल्यामुळे अपघातग्रस्त जखमींना प्राण गमविण्याची वेळ येते.

अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्यांना प्रथमोपचार मिळावे, जखमीला मदत करण्याबाबत नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी ‘युनायटेड वे मुंबई’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी ही संस्था पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात येणार असून शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील प्रत्येकी चार अशा एकूण १२ अपघातप्रवण ठिकाणांवर संस्थेने लक्ष केंद्रित केले असून त्यापैकी सहा ठिकाणी सुमारे १५० ‘जीवनदूत’ सज्ज करण्याचा संकल्प ‘युनायटेड वे मुंबई’ने सोडला आहे. सध्या या १२ ठिकाणांचा ‘युनायटेड वे मुंबई’चे प्रतिनिधी अभ्यास करीत आहेत. या अपघातप्रवण रस्त्यांवर कायम उपस्थित असलेल्या व्यक्तींचा शोध संस्थेतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी टॅक्सी-रिक्षा स्टॅण्डवर उपस्थित असणारे चालक, दुकानदार, फेरीवाले, रहिवाशी आदींबरोबर चर्चेची सत्रे सुरू झाली आहेत.

येथे जीवनदूत तैनात

 • पूर्व मुक्त मार्ग, प्लॉट नं. ९ ते ६, पी. डिमेलो मार्ग, डोंगरी
 • सायन सर्कल पुलासमोर, सायन
 • रमाबाई नगर ते कामराज नगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, घाटकोपर (पू.)
 • बैंगनवाडी वाहतूक सिग्नल, गोवंडी,
 • वाकोला पूल, पश्चिम द्रुतगती महामार्ग
 • पुष्पा पार्क बस थांबा, दिंडोशी

जीवनदूत कोण?

 • पहिल्या टप्प्यामध्ये त्या परिसरात उपलब्ध असलेले टॅक्सी-रिक्षाचालक, फेरीवाले, दुकानदार, रहिवाशी यांच्यातून ‘जीवनदूतां’ची निवड करण्यात येणार आहे.
 • त्यानंतर या ‘जीवनदूतां’ना आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी, प्रथमोपचार कसे करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल.
 • या प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकारच्या १०८ रुग्णवाहिका सेवेचीही प्रात्यक्षिकासह ओळख करून देण्यात येणार आहे.
 • पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, नामांकित डॉक्टरांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • जखमीला रुग्णालयात दाखल करणाऱ्याची पोलीस ठाणे, रुग्णालयाच्या फेऱ्यातून सुटका करणारा कायदा अस्तित्वात आला असून त्याची माहिती वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांमार्फत ‘जीवनदूतां’ना देण्यात येणार आहे.
 • दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘युनायटेड वे मुंबई’चे ‘जीवनदूत’ जखमींना मदत करण्यासाठी सज्ज राहणार आहेत.
 • भविष्यात जखमींचे प्राण वाचविणाऱ्या ‘जीवनदूतां’चा गौरव करण्यात येणार आहे.
 • नोव्हेंबरमध्ये सहा अपघातप्रवण रस्त्यांवर जखमींचे प्राण वाचविण्यासाठी ‘जीवनदूत’ तैनात करण्यात येणार आहेत.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५० टक्के व्यक्तींचा तात्काळ प्रथमोपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होतो. अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी म्हणून ‘जीवनदूत’ तैनात करण्याची संकल्पना पुढे आली.

अजय गोवले, ‘युनायटेड वे मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 12:17 am

Web Title: road accident issue jeevan doot
Next Stories
1 व्यंगचित्रातून राज ठाकरेंचं ‘लक्ष्मीपूजन’! मोदी-शहांवर पुन्हा निशाणा
2 शिवसेना प्रवेशासाठी पैशांची ऑफर होती; मनसेच्या नगरसेवकाची ‘एसीबी’कडे तक्रार
3 परिवहन मंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ, कर्मचारी संघटना सातव्या वेतन आयोगावर ठाम
Just Now!
X