18 February 2019

News Flash

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण कधी?

अपघातात २०१६ पासून ५४२ जणांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

|| सुशांत मोरे

अपघातात २०१६ पासून ५४२ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडल्याने या मार्गावर खड्डय़ांबरोबरच वाहतुक कोंडी, अपघात यांना तोंड द्यावे लागत आहे. खड्ड्यांबरोबरच या मार्गावरील बहुतांश रस्ते एकेरी आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात वाढणाऱ्या वाहनांमुळे वाहतुक कोंडी होते. त्यातच घाटातील अरूंद वळणावळणाचे रस्ते आणि बेदरकारपणे चालविली जाणारी वाहने यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. या मार्गावर गेल्या अडीच वर्षांत ५४२ जणांचा मृत्यू झाल्याचे  पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून समोर आले.

लांजा तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी झालेल्या अपघातामुळे सुरक्षित प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांमुळे या महामार्गावर  वाहनांची वर्दळ वाढते. या शिवाय रस्त्यावरील खड्डे, काही ठिकाणचे एकेरी रस्ते, अपघात यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे प्रवासासाठी चार ते पाच तासांचा जादा वेळ गणेशभक्तांना लागत आहे. मंगळवारी लांजा तालुक्यातील वाकेडजवळ झालेल्या अपघातानंतरही येथे मोठी कोंडी झाली. ही कोंडी फोडण्यासाठीही बराच वेळ गेला. त्यानंतर बुधवारी माणगावनजीकही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माणगावजवळ एसटी स्थानकातून मुख्य रस्त्यावर अनेक गाडय़ा बाहेर पडताना वाहतूक कोंडी होत असल्याचे महामार्ग पोलीसांकडून सांगण्यात आले. हीच परिस्थीती पेण, वडखळ, महाडजवळही होत आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर दरम्यान ८२ किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असून यातील दुसऱ्या टप्प्यातील ४२ किलोमीटरच्या रस्त्यांवर खड्डे आहेत. परिणामी कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावत आहे. त्यामुळे मुंबई ते रत्नागिरी आणि त्यापुढील प्रवासासाठी जादा वेळ मोजावा लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर दरम्यान ८२ किलोमीटरच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अजूनही अपूर्णच आहे. चौपदरीकरणाची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर वाहन चालकांचा प्रवास सुकर झाला असता.

मुंबई ते गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील कामाला २०११ मध्ये मंजुरी देण्यात आली. मात्र अद्यापही यातील कामे अपूर्णच आहेत. या टप्प्यानंतर इंदापूर ते कशेडी टप्पाही केला जाणार होता. तेही मार्गी लागला नाही. जानेवारी २०१६ मध्ये निवळी येथे भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचे भूमिपूजन करताना १ मे २०१८ मध्ये या टप्प्यातील काम पूर्ण होईल, अशी माहितीही दिली होती.

या मार्गावरील पळस्पे ते इंदापूर दरम्यान खड्डेही आहेत. त्यातच महामार्गावर एकेरी रस्ताही असल्याने वाहन चालकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. प्रवास वेळ वाचविण्यासाठी अनेक चालक बेदरकारपणे वाहन चालवितात व अपघातांचा सामना करावा लागतो.  – विजय पाटील, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस मुख्यालय

First Published on September 15, 2018 2:03 am

Web Title: road accidents in maharashtra 7