गिरगावातील काही चाळींना धोका?

गिरगावमधील विठ्ठलभाई पटेल मार्गावरील दुसऱ्या दुभाष लेनलगत इमारतीच्या पायासाठी खोदकाम सुरू असून पुनर्विकास सुरू असलेल्या इमारतीलगतचा रस्ता मंगळवारी खचून मोठा खड्डा पडला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करताना आसपासच्या इमारतींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. आपल्या चाळीसमोरील रस्ता खचल्यामुळे दुसऱ्या दुभाष लेनमधील रहिवाशांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली असून पालिकेने विकासकावर नोटीस बजावली आहे.

गिरगावमधील विठ्ठलभाई पटेल मार्गावरील दुसऱ्या दुभाष लेनच्या नाक्यावरील धारिया मेन्शन को-ऑप. हौसिंग सोसायटीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला. त्यासाठी विकासकाची नियुक्ती करण्यात आली. चार-पाच वर्षांपूर्वी पुनर्विकासासाठी जुनी इमारत पाडण्यात आली. गेल्या एक वर्षांपूर्वी या इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरू झाले. खोदकाम करताना आसपासच्या चाळींना हादरे बसू लागल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी पुनर्विकासाचे काम सुरू असलेल्या भूखंडालगतचा रस्ता अचानक खचू लागला होता. या संदर्भात पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान दुसऱ्या दुभाष लेनमधील रस्ता खचत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने १२ मे रोजी इमारत आणि प्रस्ताव विभागाला पत्र पाठवून या घटनेची माहिती दिली. तसेच खचलेल्या रस्त्याची पाहणी करून विकासकावर कारवाई करण्याची सूचनाही या पत्रात करण्यात आली होती. रस्ता खचल्याचे निदर्शनास आल्यानंतर भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. केवळ खचलेल्या रस्त्याच्या भोवती मातीने भरलेल्या गोणी रचून ठेवण्यात आल्या होत्या.

दुसऱ्या दुभाष लेनमधील कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंगसमोरील रस्ता मंगळवारी रात्री मोठय़ा प्रमाणावर खचला. पूर्वी खचलेल्या रस्त्याभोवती रचून ठेवलेल्या गोणी या खड्डय़ात पडल्या. रस्त्यावर साधारण १५ फूट लांब, आठ फूट रुंद आणि सुमारे १५ फूट खोल खड्डा पडला. इमारतीपासून अवघ्या तीन-चार फुटावर खड्डा पडल्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अनेक रहिवाशांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. तर काही रहिवाशांनी थेट पोलीस ठाणे गाठले. मात्र रात्री उशिरापर्यंत निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था होऊ न शकल्यामुळे रहिवाशांना कॉन्ट्रॅक्टर बिल्डिंगमधील आपल्या निवासस्थानी परतावे लागले.  मात्र मंगळवारी रात्री घटनास्थळी सरकारी यंत्रणांमधील एकही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. म्हाडा अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी पाहणी केली होती. पुनर्विकास होत असलेल्या इमारतीच्या आसपास दाटीवाटीने इमारती उभ्या असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची सूचना म्हाडाकडून विकासकाला करण्यात आली होती. मात्र विकासकाने आसपासच्या इमारतींच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारी रस्ता मोठय़ा प्रमाणावर खचला. याप्रकरणी पालिकेने विकासकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका अनुराधा पोतदार यांनी केली.