ठिकठिकाणी खड्डे; पेव्हरब्लॉक उखडल्याने दुर्दशा

मुंबई : या वर्षांतील पहिल्याच पावसाने मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बहुतेक रस्ते, गल्ल्या खड्डय़ांनी भरल्या आहेत तर पेव्हर ब्लॉकचे रस्ते ठिकठिकाणी खचले आहेत. वेळीच दुरुस्ती झाली नाही तर अवघ्या पंधरवडय़ावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यात मुंबईकरांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यांवर फिरावे लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत रविवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी पहाटे ओसरला. या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची दैना झाली असून रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने वाहने चालवताना अनेक अडचणी येत होत्या. खड्डे चुकवत, रस्त्यावर पसरलेल्या मातीचा अंदाज घेत गाडी चालवताना कसरत करावी लागत होती. त्यातच अनेक ठिकाणी मॅनहोलच्या आसपासचा भाग खचला आहे. लोखंडी झाकणांभोवतीचे डांबर निघून गेल्याने रस्त्यांवर पाच ते सहा इंचाचे खड्डे निर्माण झाले आहेत. बऱ्याचदा या ठिकाणी पाणी साचले असल्याने अंदाज चुकून गाडय़ा खड्डय़ांत आदळत आहेत. तर काही रस्त्यांवर जुने खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली खडी, डांबर, वाहून गेले आहे. त्यामुळे त्या रस्त्यांची पुन्हा एकदा दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या गाडय़ांचा वेग मंदावल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी दिसून आली.

माटुंगा स्थानकाबाहेर असलेल्या पुलावर दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. डांबरी रस्त्यावर सिमेंट काँक्रीटने केलेली डागडुजी पावसाच्या माऱ्यापुढे न टिकल्यामुळे नांगरलेल्या जमिनीसारखी इथल्या पुलाची अवस्था झाली आहे. यावरून बऱ्याच दुचाकी घसरत असल्याचे दिसून आले. बहुतांशी रस्ते जोड दिलेल्या ठिकाणी खचले आहेत. बीकेसीकडे जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग पेव्हर ब्लॉकने तयार केला असून अनेक पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. पेव्हर ब्लॉकचा वापर करून तयार केलेले बरेच रस्ते पहिल्या पावसात खचले आहेत. शीव, धारावी, दादर, परळ, लालबाग, भायखळा, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी परिसरात अशीच परिस्थिती दिसून आली.

रस्त्यांचे कामही धोकादायक  

सध्या मुंबईत बऱ्याच रस्त्यांची दुरुस्ती, पुनर्बाधणीची कामे सुरू असल्याने तेथील रेती, माती, खडी पावसाच्या पाण्याने वाहून मुख्य रस्त्यांवर आली आहे. त्यामुळे गाडय़ा घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकींची चाके अशा खडीवरून सर्रास घसरत आहेत.