नवी मुंबई, ठाणे, कळवा असा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी ठाणे-बेलापूर समांतर मार्गाची वाट अनेक वर्षांपासून पाहणाऱ्या हजारो प्रवाशांची स्वप्नपूर्ती नवी मुंबई पोलिसांच्या दबंगशाहीमुळे रखडली आहे. ११० कोटी रुपयांच्या या रस्ते प्रकल्पाच्या मधोमधच एखाद्या सराईत भूमाफियाप्रमाणे नवी मुंबई पोलिसांनी बेकायदा पोलीस ठाणे उभारले आहे. या अडथळ्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी या बेकायदा पोलीस ठाण्याचे मोठय़ा दिमाखात शुभारंभ केल्यामुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारीही सध्या चक्रावून गेले असून कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद मागायची कुठे, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे.
नवी मुंबई-ठाणे-मुंबई असा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नवी मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी १४ किलोमीटर अंतराच्या ठाणे-बेलापूर मार्गाचे काँक्रीटीकरण केले. दरवर्षी पावसाळ्यात सहस्र खड्डेमय होणाऱ्या या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या काँक्रीटीकरणामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र, औद्योगिक पट्टय़ातील अवजड वाहनांची गर्दी आणखी वाढल्यामुळे ठाणे-बेलापूर रस्ता सध्या वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने तुर्भे येथील फायझर कंपनी ते महापे जंक्शन आणि महापे जंक्शन ते मुकंद कंपनी अशी ठाणे-बेलापूर मार्गास समांतर रस्त्याची आखणी केली. त्यासाठी सुमारे ११० कोटी रुपयांची तरतूद केली.
या कामातील पहिला टप्पा म्हणून महापे येथील सरोवर विहार हॉटेलमागून मुकंद कंपनीपर्यंत सुमारे सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले. अजवानी कन्स्ट्रक्शन कंपनीस सुमारे ५५ कोटी रुपयांचे ते काम देण्यात आले आहे. हा रस्ता पूर्ण होताच ठाणे-बेलापूर मार्गावरील अवजड वाहतूक या मार्गावरून वळवायची, असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासांकरिता हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. एकीकडे हजारो-लाखो प्रवाशांच्या हितासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प राबविला जात असताना नवी मुंबई पोलिसांच्या दबंगशाहीमुळे या प्रकल्पाच्या कामात मोठा अडथळा उभा राहिला.
अडीच महिन्यांपूर्वी नवी मुंबई पोलिसांनी रबाळे औद्योगिक पोलीस ठाणे सुरू करत चौपदरीकरणाच्या कामात अडथळा उभा राहील, अशा पद्धतीने पोलीस ठाण्याची बेकायदा इमारत उभी केली आहे. तिचा शुभारंभ पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी महापालिकेने नवी मुंबई पोलिसांना एक नोटीस बजावली. ही इमारत बेकायदा असून रस्त्याच्या कामात अडथळा आणत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले; परंतु एकीकडे उद्घाटनाला गणेशदादांची उपस्थिती आणि दुसरीकडे पोलीसदादांची इमारत, अशा कात्रीत अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी सापडल्याने या बेकायदा बांधकामावरील कारवाईचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.