हाती घेतलेल्या १००४ पैकी ४१९ रस्त्यांची कामे पूर्ण होण्याचा पालिकेचा दावा

विविध कारणांनी गेले वर्षभर रखडत चाललेले रस्त्यांचे काम खडीच्या तुटवडय़ामुळे बंदच होण्याच्या मार्गावर आले होते. मात्र आता पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्यांच्या कामाने वेग घेतला असून मूळ रस्त्यांपैकी ४० टक्के रस्त्यांचे सुधारित लक्ष्य पालिकेच्या आवाक्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. खोदलेल्या ५५८ रस्त्यांपैकी ४१९ रस्ते मेअखेर पूर्ण झाले तर मुंबईकरांची खोदकामांमधून किमान चार महिने सुटका होईल.

दरवर्षी मुसळधार पावसापेक्षाही मुंबईकर रस्त्यावरील खड्डय़ांचा धसका घेतात. शहर खड्डेविरहित करण्यासाठी महानगरपालिकेकडून दरवर्षी शेकडो रस्त्यांचे काम हाती घेतले जाते. मात्र पावसाळा आला तरी रस्त्यांची कामे थांबत नाहीत व मुंबईकरांचा खड्डय़ातील प्रवासही सुरूच राहतो. गेल्या वर्षी १००४ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी प्रत्यक्षात खोदण्यात आलेले तब्बल ५५८ रस्ते आणि जलवाहिन्या-सेवावाहिन्यांची निघालेली कामे यामुळे रस्त्यांचे काम कासवगतीने सुरू होते. त्यातच नवी मुंबईतील दगडखाणी बंद करण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या खडीच्या तुटवडय़ाने मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत ४०० पैकी अवघ्या ५३ रस्त्यांचे काम पूर्ण झाले होते. मात्र २० मेच्या ताज्या अहवालानुसार २६४ रस्ते नव्याने तयार करण्यात आले असून ११८ रस्त्यांचे पृष्ठभाग नीट करण्यात आले आहेत. कंत्राटदारांची जबाबदारी असलेल्या गेल्या तीन वर्षांतील रस्त्यांपैकी ६८ रस्त्यांची कामे झाली असून १५ कामे बाकी आहेत. उर्वरित रस्त्यांची कामेही ३१ पर्यंत पूर्ण होतील, असा दावा पालिकेचे अधिकारी करत आहेत.

निवडणुकांचे वर्ष पाहून गेल्या वर्षी तब्बल १०१७ रस्तेकामांचे प्रस्ताव मान्य करण्यात आले होते. त्यापैकी १००४ रस्त्यांची व चौकांची कामे १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र शहराच्या सुमारे १९०० किलोमीटर रस्त्यांपैकी ३५० किलोमीटरचे रस्ते या प्रकल्पकामात खोदले जाणार असल्याने वाहतूक पोलिसांनी सर्व रस्त्यांना एकत्रित परवानगी देण्याचे नाकारले. त्यानंतर तीन टप्प्यांत ही सर्व कामे हाती घेण्याचे ठरले व शहरातील ५५८ रस्ते खोदण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी जलवाहिन्या, सेवावाहिन्यांची कामे निघाल्याने रस्त्यांच्या कामाला गती आली नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यात पावसापूर्वी किमान ४१९ रस्ते पूर्ण करण्याचा नवा अंदाज समोर ठेवण्यात आला. याच दरम्यान जुन्या रस्त्यांवर खड्डे उद्भवू नयेत यासाठी रस्त्यांचा पृष्ठभाग नीट करण्याचे कामही हाती घेण्यात आले. यातील प्राधान्यक्रमाने ११० रस्ते व त्यानंतर ९३८ रस्त्यांपैकी पन्नास टक्के रस्ते पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले.