महापालिका प्रशासन आणि पोलीस आयुक्त यांच्यातील बैठकीनंतर निर्णय
मुंबई शहर विभागातील रस्ता दुरुस्तीची कामे आता २४ तास करता येणार आहेत. या अगोदर हे काम वाहतूक पोलिसांच्या परवानगीने फक्त रात्रीच्या वेळेतच करता येत होते. महापालिका प्रशासन आणि मुंबई वाहतूक पोलीस यांच्यातील बैठकीनंतर वाहतूक पोलिसांनी शहर भागात रस्ता दुरुस्तीचे काम २४ तास करण्याची परवानगी दिली आहे. महापालिकेला ही कामे वाहतूक पोलिसांच्या परवानगीने रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेतच करता येत होती. सहा तासांच्या या परवानगीमुळे काम करण्यावर मर्यादा येत होत्या.
महापालिका आयुक्त अजय मेहता आणि बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी पालिका प्रशासन व पोलीस यांच्यातील संवाद वाढावा आणि नागरी सुविधांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी, त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सप्टेंबर महिन्यापासून या संदर्भात समन्वय बैठक आणि पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
परिमंडळ स्तरावरही दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी पालिकेच्या परिमंडळांचे उपायुक्त व अतिरिक्त पोलीस आयुक्त/पोलीस उपायुक्त यांची बैठक आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ताडदेव, मलबार हिल, पायधुनी, काळबादेवी, भायखळा, नागपाडा, माटुंगा, भोईवाडा, वडाळा, वरळी, माहिम, कुलाबा येथील रस्त्यांचा समावेश आहे.
रस्ता दुरुस्तीची सर्व कामे वाहतूक पोलिसांच्या सल्ल्यानुसार आणि वाहतुकीला अडथळा येणार नाहीत, अशाच प्रकारे करणे आवश्यक आहे. दुरुस्तीची कामे करताना खोदकामासाठी मात्र पूर्वीप्रमाणेच रात्री ११ ते सकाळी ६ असे वेळेचे बंधन ठेवण्यात आले आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठीची असलेल्या वेळेचे बंधन काढून टाकण्यात आल्याने रस्ते दुरुस्तीची कामे आता अधिक वेगाने आणि कमी कालावधीत करता येतील, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.