पाऊस चार दिवसांवर आला असतानाही ३०० हून अधिक रस्त्यांची कामे सुरू असून मंजुरी मिळालेल्या रस्त्यांपैकी ४० टक्के कामेही पावसाळ्याआधी पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ६० टक्के रस्त्यांचे म्हणजेच ६०० हून अधिक रस्ते नव्याने बनवण्याचे तसेच ६६६ रस्त्यांच्या पृष्ठीकरणाचे काम पावसाळ्यानंतरही सुरू राहील. सध्या अर्धवट खोदलेले रस्ते पावसाआधी वाहतुकीसाठी योग्य केले जाणार असले तरी ऑक्टोबरनंतरही पुढील पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांच्या वाटेला खोदलेले रस्ते येणार आहेत.

निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर गेल्या वर्षी वारेमाप रस्त्यांना परवानगी देण्यात आल्यावर प्रत्यक्षात या रस्त्यांची कामे पूर्ण करताना पालिकेच्या नाकीनऊ आले आहेत. मागील वर्षी १००४ रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्षात त्यातील ५५८ रस्त्यांची कामे हाती घेतली गेली. रस्त्यांची कामे आस्तेकदम सुरू झाल्याने मे महिन्याच्या सुरुवातीला सुधारित उद्दिष्ट समोर ठेवून ४५० रस्त्यांची कामे मे २०पर्यंत पूर्ण करण्याचे ठरले.

प्रत्यक्षात पाऊस तोंडावर आला असताना अजूनही त्यातील १०८ रस्त्यांची कामे बाकी आहेत. यातील ९७ रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत तर ११ रस्त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी ३ जून होईल, असा नवा अंदाज पालिकेने मांडला आहे. उर्वरित रस्त्यांची कामे मात्र पावसानंतर पुन्हा सुरू केली जातील.

एकीकडे रस्ते नव्याने तयार करण्याचे काम डोईजड झालेले असताना संपूर्ण रस्ता पुन्हा बनवण्याऐवजी हजाराहून अधिक रस्त्यांच्या पृष्ठभागाची कामेही पालिकेने हाती घेतली होती. १०४८ रस्त्यांपैकी ३८२ रस्त्यांचे काम मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १४१ रस्त्यांची कामे झाली असून पुढील चार दिवसांत १०१ रस्ते पूर्ण होतील, असा दावा पालिकेने केला आहे. उर्वरित १४० रस्त्यांसह ६६६ रस्त्यांना ऑक्टोबरनंतरचाच मुहूर्त लाभणार आहे. त्यांच्यासोबतच तब्बल ६०० रस्ते नव्याने बनवण्याचे कामही ऑक्टोबरनंतरच मार्गी लागेल. त्यामुळे पावसाळ्यानंतरही मुंबईच्या रस्त्यांवरील खोदकाम पुढील पावसाळ्यापर्यंत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

रस्ते कामांचे गणित चुकणार?

हाती घेतलेल्या रस्त्यांची कामे २० मे पूर्वी आटोपण्याचे ध्येय ठेवण्यात आले होते. मात्र खडीच्या टंचाईचे कारण दाखवत पालिकेने ३१ मेपर्यंत मुदत वाढवली. शुक्रवारी पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार काही रस्ते ३ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र २९ मेपासून मुंबईत पावसाच्या पूर्वमोसमी सरींना सुरुवात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पालिकेचे रस्त्यांचे गणित याही वर्षी चुकण्याचीच शक्यता अधिक आहे.