माहिती अधिकार कार्यकर्त्यांला धमकी

रस्ते घोटाळ्याप्रकरणी जनहित दाखल करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांला धमकावल्याच्या आरोपाप्रकरणी ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची आता पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती शुक्रवारी राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयाला देण्यात आली.

जयस्वाल यांच्यावरील आरोपांची चौकशी करून हे आरोप बिनबुडाचे असल्याचा सुरुवातीला दावा करणाऱ्या अधिकाऱ्याने नंतर मात्र या प्रकरणाचा अधिक तपास करण्याची गरज असल्याचे प्रतिज्ञापत्र मागील सुनावणीच्या वेळी सादर केले होते. त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेबाबत आणि एकूणच तपासाबाबत न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच हा अधिकारी या प्रकरणाचा तपास करण्यास विश्वासपात्र नाही, असे ताशेरे ओढताना प्रकरणाचा तपास अन्य अधिकाऱ्याकडे देणार की नाही याबाबत पोलीस आयुक्तांनी निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले जातील, असा इशारा न्यायालयाने दिला होता.

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी झाली असता जयस्वाल यांच्यावरील आरोपांची पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती साहाय्यक सरकारी वकील रीना यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर या प्रकरणाची जलदगतीने चौकशी करून त्याबाबतचा अहवाल १२ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. उपायुक्तांमार्फत आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याने न्यायालयीन चौकशीच्या आदेशाची गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.