मेट्रोच्या कामांच्या ठिकाणी लावलेल्या अडथळ्यांनी (बॅरिकेड्स) गणेशमूर्तीच्या आगमनाचा मार्ग अडवलेला असला तरी दादर, माहीममध्ये मात्र यावर्षी या बॅरिकेड्समधून मूर्ती नेता येणार आहेत. पालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या पुढाकाराने ही कोंडी फुटली असून गणेशमूर्तीच्या आगमनाच्या आणि विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी टळणार आहे.

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे पालिकेच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून मेट्रोच्या कामांमुळे ठिकठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना गणेशोत्सवादरम्यान निघणाऱ्या मिरवणुकांमुळे त्यात भर पडत असते. दादर, माहीम या परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह अधिक असतो. तसेच या परिसरात दादर आणि माहीम चौपाटीवर विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशमूर्तीची संख्याही अधिक असते. त्यामुळे या भागात मिरवणुकी दरम्यान खूप वाहतूक कोंडी होत असते. यावर्षी मात्र ही समस्या या विभागापुरती सुटणार आहे.

जी उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीत धारावी, माहीम, शितलादेवी आणि दादर ही मेट्रोची चार स्थानके आहेत. मात्र या स्थानकाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या विभागापुरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. आम्ही ट्राफिक पोलिस आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत या भागाची पाहणी केली. त्यानंतरच बॅरिकेड्सच्या मधून गणेशमूर्ती आणण्यासाठी आणि नेण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. १८ ऑगस्टच्या रविवारी काही सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती या बॅरिकेड्समधून नेण्यात आल्या. विसर्जनाच्या दिवशीही मिरवणुकांना परवानगी देण्याचा विचार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.