रेश्मा शिवडेकर

बोरिवलीतील शिंपोली भागातील रस्ता, पदपथ मोकळा;  फडणवीस, उद्धव यांच्या कार्यक्रमापूर्वी पालिकेची ‘स्वच्छता’

मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख येती घरा, तोचि दिवाळी-दसरा.. असे गाणे सध्या बोरिवली (पश्चिम) शिंपोली परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या ओठांवर तरळते आहे. त्याला कारणच तसे आहे. एरवी बेकायदा खाटीकखाने, गॅरेज, फेरीवाले, पदपथावर संसार थाटून बसलेल्यांमुळे आक्रसलेला इथला संपूर्ण पदपथ आणि अर्धाअधिक रस्ता कधी नव्हे तो मोकळा झाला आहे. हे सगळे अतिक्रमणच नव्हे तर रस्त्याच्या कडेची, नेहमी कचऱ्याने आणि दरुगधीने वाहणारी कचराकुंडीही बुधवारी सायंकाळपर्यंत गायब झाली होती. त्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढल्याने वाहतुकीलाही लागलेली शिस्त पाहून काही रहिवाशांचे तर डोळे भरून आले!

अर्थात, हे सुखद क्षण एका रात्रीत त्यांच्या आयुष्यात येण्याचे कारण म्हणजे इथले ‘अटल स्मृती उद्यान’. या उद्यानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गुरुवारी (४ जुलै) सायंकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे या दोघांचे पाय या गल्लीला (खरे तर मुख्य रस्ताच) लागले. एक राज्याचा तारणहार, तर दुसरा मुंबईचा. पण त्या निमित्ताने इथला रस्ता आणि पदपथ मोकळे झाले. या मोकळ्या पदपथांवर शिंपोलीवासीयांना दिवाळी-दसरा साजरा करावासा न वाटला तरच नवल!

एरवी या रस्त्याचे हाल पालिकेच्या ध्यानीमनीही नसतात. इथल्या शिंपोली टेलिफोन एक्स्चेंजच्या प्रवेशद्वाराच्या तोंडावरच मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. चटया, चादरी, एक्स्चेंजच्या संरक्षक भिंतीला अडकवलेले कपडे, भांडीकुंडी, ड्रम, खाटा असे घरात वापरले जाणारे एकूणएक सामान इथल्या पदपथावर मांडलेले दिसते. याला भरीस भर म्हणून विविध देवदेवतांच्या तसबिरी, मूर्ती, त्यांच्याभोवती मांडलेली पूजाअर्चा, नियमित होणारे समाजाचे धार्मिक कार्यक्रम असा अध्यात्मही पदपथ-रस्त्यांवर ओसंडून वाहत असतो. समोरच कचराकुंडी. ती कायम कचऱ्याने वाहणारी.

पुढे शिंपोलीकडे जाणारा संपूर्ण रस्ता बेकायदा खाटीकखाने, चिकन-मटण, अंडी विकणारे विक्रेत्यांनी व्यापलेला. या सगळ्यामुळे या परिसराची पार दैना उडाली आहे. गॅरेजचा धंदा करणाऱ्यांनी तर रस्ता, पदपथ आणि मागची मैदानाची मोकळी जागाही अतिक्रमित केली आहे. धुण्यासाठी आलेल्या वाहनांवर उडविले जाणारे पाण्याचे तुषार झेलतच पादचाऱ्याला पुढे जावे लागते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते अडविल्याने चालणाऱ्यांबरोबरच वाहनचालकांचीही कोंडी होते. पण शिंपोली रस्त्यावरील हे चित्र एका रात्रीत बदलले. बुधवारी दिवसभरात इथले सगळे अतिक्रमण काढून टाकण्यात आले होते. गॅरेजवाले, खाटीकखाने यांचा मागमूसही रस्त्यावर नव्हता.

याबाबत पालिकेचे इथले म्हणजे आर मध्यचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर यांच्याशी संपर्क साधला असता, अटल स्मृती उद्यानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने नव्हे तर, यापुढेही हा रस्ता असाच मोकळा व अतिक्रमणमुक्त ठेवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अर्थात यापूर्वीही पालिकेने रस्ते, पदपथावरील अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा रस्त्यावर संसार व व्यवसाय थाटले गेले. आताही मुख्यमंत्री, सेना कार्याध्यक्षांची पाठ वळल्यानंतर परिस्थिती ‘पहिले पाढे पंचावन्न’ होणार याबाबत रहिवाशांना कोणतीही शंका नाही.

मी स्वत: गाडी चालवते. इथल्या अतिक्रमणामुळे या रस्त्यावरून गाडी चालविताना काय काय अडचणी येतात याची जाणीव मला आहे. आज राजकीय नेत्यांना स्वच्छ, मोकळे रस्ते, पदपथ दाखविण्यासाठी इथले अतिक्रमण हटविण्यात आले आहे. ते निश्चितच चांगले आहे. परंतु इथली रहिवासी म्हणून हे चित्र कायम राहावे, असे मला वाटते.

– गौरी सुर्वे, रहिवासी, शिंपोली