मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही मुखपट्टीविना रस्त्यावर; कारवाईसाठी पालिकेची कुमक तोकडी

मुंबई : ‘मुखपट्टीचा वापर, सामाजिक अंतराचा नियम पाळा आणि टाळेबंदी टाळा’ असे तंबीवजा आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतरही सोमवारी मुंबईतील अनेक भागांत करोना प्रतिबंधक नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आले. बाजारपेठा असो की रेल्वेस्थानके, ग्राहक असोत की विक्रेता, फेरीवाला असो की दुकानदार सर्वच ठिकाणी मुखपट्टीविना संचार करणारे सोमवारीही आढळून आले.  ‘बेजबाबदार’ मुंबईकरांपुढे पालिकेची यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसत आहे.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना पुन्हा टाळेबंदी लागू करण्याचा इशारा दिला होता. नागरिकांनी करोना नियमांचे पालन न केल्यास आठ दिवसांनी टाळेबंदी लावण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी ‘नियम पाळा, टाळेबंदी टाळा’ असे आवाहन केले होते. तसेच नागरिकांमध्ये सामाजिक भान यावे याकरिता ‘मी जबाबदार’ ही मोहीमही जाहीर केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही मुंबईत बेजबाबदार नागरिक सोमवारी दिसून आले. नियम धुडकावणाºयांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यासाठी पालिका कर्मचारी आणि क्लिन-अप-मार्शलची पथके मुंबईवर तैनात झाली आहेत. असे असले तरीही बेफिकीर मुंबईकर मुखपट्टीविनाच दिसत होते. अनेक भागांत सामाजिक अंतराचा नियम पायदळी तुडवत मुंबईकरांनी गर्दी केल्याचेही दृष्टीस पडत होते.

रुग्ण वाढीस सुरुवात होताच हॉटेल, मंगल कार्यालये, बाजारपेठा आदी ठिकाणी लक्ष ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. असे असले तरीही काही हॉटेलमध्ये आजही सामाजिक अंतराच्या नियम पाळला जात नाही. कार्यालये, दुकानांबाहेर सॅनिटायझरची व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र तशी व्यवस्था नसल्याचे आढळते. ग्राहक हात निर्जंतुक न करताच खरेदी करीत आहेत.

आठ लाखांचा दंड वसूल

मध्य रेल्वेवर १ फे ब्रुवारी ते २१ फे ब्रुवारीपर्यंत मुखपट्टीविना फिरणाऱ्या तीन हजार ४९७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकू ण आठ लाख सहा हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर पश्चिम रेल्वेवरही दोन हजार २०० प्रवाशांवर कारवाई करताना एकू ण तीन लाख २१ हजार रुपये दंड वसुली के ल्याची माहिती देण्यात आली.