प्रशासनाकडून मंजुरीसाठी धडपड; प्रत्यक्ष कामाला चार महिन्यांनंतर मुहूर्त

पावसाळा जवळ आल्यामुळे रस्त्यांची कामे आटोपती घेण्याचे आदेश दस्तुरखुद्द पालिका आयुक्तांनी दिलेले असताना प्रशासनाने तब्बल १९ रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांचे १८.२० कोटी रुपयांचे कंत्राट कंत्राटदाराच्या खिशात टाकण्याची धडपड सुरू केली आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केल्यानंतरही पुढील चार महिने कंत्राटदाराला काम सुरू करता येणार नाही. या रस्त्यांच्या कामांसाठी पावसाळ्याच्या तोंडावरचा मुहूर्त प्रशासनाने धरल्याने विरोधकांकडून टीका होऊ लागली असून याबाबत पारदर्शकतेचे पहारेकरी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पावसाळा जवळ आल्यामुळे सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे मेअखेरीपर्यंत आटोपती घ्यावी, तसेच चर खोदण्याची कामे १९ मेपूर्वी पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. तसेच चर खोदण्यास परवानगी घेतल्यानंतर अद्याप काम सुरू न करणाऱ्यांच्या कामांना पावसाळा संपेपर्यंत स्थगिती देण्याची सूचनाही आयुक्तांनी केली आहे. असे असताना प्रशासनातर्फे वरळी, दादर, प्रभादेवी आणि आसपासच्या परिसरातील १९ रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. या १९ रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम ४.६८ टक्के कमी दराने करण्याची तयारी ए. पी. आय. सिव्हिलकॉन कंपनीने दर्शविली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेअंती या कंपनीला सुमारे १८ कोटी २० लाख ८३ हजार २०७ रुपयांचे कंत्राट देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

यापैकी काही रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्याची गरज होती. परंतु असे असतानाही प्रशासनाने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणला आहे. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर कंत्राटदाराच्या हाती कार्यादेश पडण्यासाठी १५ दिवस अथवा महिनाभराच्या कालावधी लागेल. तोपर्यंत पावसाळा सुरू होऊन ही कामे सुरूच करता येणार नाहीत. त्यामुळे सेनापती बापट मार्ग, क्रॉस रोड, टी. ए. कटारिया पुलाखालील रस्ता, भंटेवाडी शाळा एमटीएनएलजवळ, गोविंदराव पटवर्धन क्रॉस रोड, काळा किल्ला रोड, खानोलकर मार्ग, के. एल. देसाई मार्ग, फेमस लेन स्टुडिओ, साई भक्ती मार्ग, दत्ता अहिरे मार्ग, मोहन दामोदर पाटील मार्ग, हिंदवीर सेवा संघ मार्ग, सुभेदार नगर रोड, भैयासाहेब नगर रोड, मरकडेश्वर नगर रोड, गणपतराव कोकाटे मार्ग, शाहीर अमर शेख रोड, ए. के. भाये मार्ग, सखाराम बाळाजी पवार मार्ग हे छोटे रस्ते पावसाळ्यात खड्डेमय होण्याच्या शक्यतेने आसपासचे रहिवाशी आणि पादचारी हैराण झाले आहेत.