• यहाँ खुदा है, वहाँ खुदा है। जहाँ खुदा नहीं, वहाँ कल खुदेगा।
  • ऑक्टोबरपासून १००४ रस्ते, चौकांच्या कामांना सुरुवात

पावसाळय़ात पडलेल्या खड्डय़ांमुळे मुंबईकरांची हाडे खिळखिळी करणारे आणि वाहतूक कोंडीला हातभार लावणारे रस्ते आता सुरळीत होतील, ही अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरपासून शहरातील तब्बल १००४ रस्ते आणि चौकांची कामे हाती घेतली जाणार असून एकूण ३४० किलोमीटर लांबीचे रस्ते खोदले जाणार आहेत. एकाच वेळी एवढे रस्ते वाहतुकीसाठी बंद करणे शक्य नसल्याने वाहतूक पोलिसांनी या कामांना परवानगी दिलेली नाही. मात्र लवकरच ही परवानगी मिळण्याची शक्यता असल्याने हे खोदकाम सुरू होताच मुंबईभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

दरवर्षी रस्त्यांच्या कामांसाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. गेल्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये ५३१ रस्त्यांची कामे काढण्यात आली होती. मात्र हे निवडणुकीचे वर्ष असल्याने या वर्षी तब्बल १०१७ रस्ते नव्याने बनवण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यातील ३७६ रस्त्यांच्या कामांना एप्रिलमध्ये सुरुवात करण्याचे ठरले. प्रत्यक्षात अनेक परवानगी आणि मनुष्यबळाअभावी केवळ  १३५ रस्त्यांच्या कामांना हातही लावण्यात आला नाही. रस्त्यांवर ३१ मेनंतर कोणतेही खोदकाम करू नये व रस्ते वाहतुकीसाठी योग्य स्थितीत ठेवण्यात यावेत असे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्याने काम सुरू केलेल्या रस्त्यांची कामे जूनपूर्वी बंद करण्यात आली. जूनमध्ये केवळ ८३ रस्त्यांवर कामे सुरू ठेवण्यात आली होती. मात्र पावसाचे चार महिने संपल्यावर आता सर्व रस्त्यांची कामे समोर आली असून १ ऑक्टोबरपासून तब्बल १००४ रस्त्यांना हात घातला जाणार आहे.

या रस्त्यांपैकी सर्वाधिक कामे पश्चिम उपनगरात आहेत. शहराच्या दक्षिण भागात २०५ रस्ते व ५९ चौक, पूर्व उपनगरात २७४ रस्ते आणि १९ चौक तर पश्चिम उपनगरात ४०३ रस्ते व ४५ चौकांमधील रस्तेदुरुस्ती किंवा नव्याने रस्ते तयार करण्याचे काम हाती घेण्याचे महानगरपालिकेने ठरवले आहे. या रस्त्यांमुळे शहरातील ६३ किलोमीटर, पूर्व उपनगरातील ८७ किलोमीटर तर पश्चिम उपनगरातील १९० किलोमीटर लांबीचे रस्ते खणले जाणार आहेत.

नवीन तंत्रज्ञानाने तयार केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे रस्ते भविष्यातील चांगल्या वाहतुकीसाठी उपयोगी पडतील. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पालिका एका वेळी एक तृतीयांश रस्त्यांचे काम हाती घेईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तीन टप्प्यांत काम हाती घेण्यात येत असले तरी एका वेळी साधारण ३५० रस्ते व १२० किलोमीटर रस्ते बंद होतील.

एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रस्त्यांची कामे हाती घेण्यासाठी पालिका तयार असली तरी त्यामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांमुळे वाहतूक पोलिसांनी रस्त्यांना परवानगी दिलेली नाही. पालिकेने सर्व रस्त्यांच्या परवानगीसाठी अर्ज केले असून आतापर्यंत ८० रस्त्यांना परवानगी मिळाल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्थायी समितीत सांगितले. अधिकाधिक रस्त्यांना वाहतूक विभागाची परवानगी मिळावी यासाठी आयुक्त अजोय मेहता यांनी वाहतूक सहआयुक्तांची दोनदा भेट घेतली आहे.

काम सुरू होणारे रस्ते

  • शहर – २०५ रस्ते – ५९ चौक – ६३ किलोमीटर
  • पश्चिम उपनगरे – ४०३ रस्ते – ४५ चौक – १९० किलोमीटर
  • पूर्व उपनगरे – २७४ रस्ते – १९ चौक – ८७ किलोमीटर
  • एकूण – ८८२ रस्ते – १२३ चौक – ३४० किलोमीटर

एवढय़ा रस्त्यांची कामे काढण्याची कारणे

  • निवडणुकीचे वर्ष असल्याने गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट रस्त्यांची कामे.
  • पावसाळ्यापूर्वी सुरू केलेल्या रस्त्यांपैकी बहुतेक कामे अपूर्ण