• पावसाळय़ापूर्वी रस्ते चकाचक करण्याची योजना अधांतरी
  • कंत्राटदारांची मनमानी, जलवाहिन्यांमुळे कामात अडथळे

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्ते गुळगुळीत करण्याचा संकल्प महापालिकेने सोडला असला तरी घोटाळेबाज कंत्राटदारांनी कामे थांबविल्याने आणि जुनाट जलवाहिन्या आणि मलनिसारण वाहिन्यांना खोदकामामुळे अनेक ठिकाणी गळती लागत असल्याने गेल्या दोन महिन्यात रस्ता खोदण्याव्यतिरिक्त काहीच घडले नसल्याची परिस्थिती शहरात सर्वत्र दिसत आहे. कामे बरेच दिवस रेंगाळल्याने गैरसोय होऊ लागलेल्या रहिवाशांचे तर आता कंत्राटदारांशी खटकेही उडू लागले आहेत.

निवडणुकीच्या वर्षांत पालिकेने तब्बल १००४ रस्त्यांची कामे काढली आहेत. प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यात सुरू केलेल्या ४२८ रस्त्यांची कामेही कासवगतीने सुरू आहेत. गेल्या वर्षी रस्ते घोटाळ्यात नाव आलेल्या कंत्राटदारांनी नव्या रस्त्यांचे काम थांबवले असून दुसरीकडे जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्यांमधील गळतीमुळे कामे करण्यास तयार असलेल्या रस्ते कंत्राटदारांचेही हात बांधले गेले आहेत.

शहरातील रस्त्यांचा ‘कायापालट’ करण्याच्या उद्देशाने पालिकेने रस्त्यांचे विक्रमी प्रस्ताव मंजूर केले. मात्र वाहतूक विभागाने एकाच वेळी सर्व रस्ते खोदण्यास परवानगी नाकारल्याने जूनपर्यंत तीन टप्प्यात रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार होती. प्रत्यक्षात ऑक्टोबरमध्ये सुरू केलेल्या पहिल्या टप्प्यातील व पावसाळ्याआधीपासून सुरू असलेल्या रस्त्यांचीही कामे रखडली आहेत. दोन महिने उलटल्यावरही रस्त्याचा वरचा थर खरवडण्यापेक्षा काहीच घडलेले नाही. रस्ते अडल्याने स्थानिक रहिवासी कातावले आहे.

रस्त्यांची कामे कूर्मगतीने होण्याची प्रमुख कारणे

  • रस्ता खणल्यावर जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्यांची गळती
  • काम सुरू करण्यापूर्वी या वाहिन्यांची दुरुस्ती करण्याची खबरदारी घेतली गेली नाही
  • रस्ता विभाग, जलविभाग, मलनिसारण विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव.
  • रस्ते घोटाळ्यात नाव आलेल्या कंत्राटदारांचा असहकार
  • स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कंत्राटदारांवर ‘अर्थपूर्ण’ दबाव
  • रस्ते विभागातील रिक्त जागा व कामांची संख्या अधिक

डहाणूकरवाडीतील अवघ्या ५० मीटर लांबीच्या समीर चंदावरकर रस्त्यावर पेव्हर ब्लॉक काढून डांबरीकरण करायचे होते. मात्र हे चार दिवसांचे काम दीड महिना त्याच स्थितीत आहे. २२ ऑक्टोबरला स्थानिक लोकप्रतिनिधींनी नारळ वाढवल्यानंतर केवळ रस्ता खणून ठेवण्यात आला आहे. रस्त्याच्या पदपथाखालची मलनिसारण वाहिनी दुरुस्त करायची असल्याचे कारण पुढे केले जाते. मात्र आजूबाजूच्या इमारतींमधून गाडय़ाच बाहेर काढता येत नसल्याने बुधवारी सकाळी तर रहिवाशांनी कंत्राटदारांच्या माणसांसोबत वाद घातला.

प्रभाकर बेलोसे, कांदिवली