News Flash

वर्दळीच्या रेल्वे स्थानकांची रस्तेबंदी

रेल्वे स्थानक परिसरात करण्यात येणाऱ्या रस्ताबंदीमुळे प्रवशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल होत आहेत.

मेट्रोच्या कामांमुळे महत्त्वाच्या स्थानकांबाहेरील निम्म्या रस्त्यावरूनच वाहतूक; अडीच वर्षे वाहतूक कोंडीची शक्यता

मेट्रो-३ मुंबईच्या पोटातून जाणार असली तरी ठिकठिकाणी स्थानकांची कामे सुरू असून त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. चर्चगेट परिसरातील हुतात्मा चौक तसेच जे. टाटा रस्त्याचा अध्र्याहून अधिक भाग मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस बंद करण्यात आला असतानाच आता गिरगाव मेट्रो स्थानक उभारणीसाठी ग्रँटरोड परिसरातही रस्ता बंदीचे नियोजन सुरू झाले आहे. याची चाचणी पूर्ण झाली असून आता अडीच वर्षांच्या कालावधीसाठी हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अशाच प्रकारची मोठी रस्ताबंदी सीएसटी, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, दादर, सांताक्रूझ या रेल्वे स्थानक परिसरांत केली जाणार आहे. यामुळे वर्दळीच्या रेल्वे स्थानकांतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे.

रेल्वे स्थानक परिसरात करण्यात येणाऱ्या रस्ताबंदीमुळे प्रवशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल होत आहेत. येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच पादचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.तर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यावरून वळविण्यात आल्याने पर्यायी रस्त्यावर गर्दीच्यावेळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. भविष्यात अशीच रस्ताबंदी मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातही केली जाणार आहे. या दोन रेल्वे स्थानकांबरोबरच या परिसरातील विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या परिसरातील वाहतूक वळविण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. आता कंत्राटदार वाहतूक पोलिसांकडून परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करणार आहेत. म्हणजे येत्या काही महिन्यांत दक्षिण मुंबईतील सर्वच महत्त्वाच्या स्थानकांच्या बाहेर रस्ताबंदी सुरू होणार आहे. ही रस्ताबंदी मेट्रो-३च्या मार्गाच्या कामाबरोबरच स्थानकांच्या कामासाठीही ही रस्ताबंदी लागू राहणार आहे. स्थानकांसाठी लागू करण्यात येणारी रस्ताबंदी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहे. परिणामी, या परिसरातील रहिवाशांना अडीच वर्षांसाठी मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागणार आहे.

मुंबईतील मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणून ओळख असलेल्या दादर रेल्वे स्थानक परिसरातही अशा प्रकारची रस्ताबंदी करण्यात येणार आहे. या परिसरात मार्ग वळविण्यासाठी वाहतूक विभागाच्या सहआयुक्तांची परवानगी मिळाली आहे. यानंतर कंपनीने या भागात काम सुरू केले असून नियोजनानुसार दादर आणि शितलादेवी स्थानक परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर रस्ताबंदी केली जाणार आहे. मेट्रो -३च्या कामाच्या पाचव्या टप्प्यात सांताक्रूझ स्थानक परिसरात रस्ताबंदी करावी लागणार आहे. मात्र सध्या या टप्प्यातील वांद्रे कुर्ला संकुल आणि विद्यानगरी स्थानकाचे काम सुरू आहे. हे काम हाती घेण्यात आले आहे. सांताक्रूझ स्थानक परिसरात झाडे कापण्याचे सुरू झाले असून ते पूर्ण झाल्यावर पुढील काम हाती घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी मेट्रो-३ची स्थानके आहेत. त्या सर्व रस्त्यांवर अडीच वर्षांसाठी काम चालणार आहे. कुणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी टप्याटप्याने काम पूर्ण करून रस्ता सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • गिरगाव मेट्रो स्थानक उभारणीसाठी ग्रँटरोड परिसरातील रस्ता अडीच वर्षांच्या कालावधीसाठी बंद करण्यात येणार आहे.
  • भविष्यात अशीच रस्ताबंदी मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी रेल्वे स्थानकांच्या परिसरातही केली जाणार आहे.
  • येत्या काही महिन्यांत दक्षिण मुंबईतील सर्वच महत्त्वाच्या स्थानकांसह दादर स्थानकाबाहेर रस्ताबंदी सुरू होणार आहे. ही रस्ताबंदी मेट्रो-३च्या मार्गाच्या कामाबरोबरच स्थानकांच्या कामासाठीही लागू राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 3:30 am

Web Title: roadblock for mumbai metro railway stations mumbai metro
Next Stories
1 महाविद्यालयांच्या चुकीचा ३० विद्यार्थ्यांना फटका
2 शितपच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई
3 पायाच्या अंगठय़ात, दातांत कुंचला धरून भविष्याचे सुखद चित्र