दोन दिवसांच्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण

गेले दोन दिवस कोसळलेल्या संततधार पावसाने मुंबईमधील रस्त्यांची चाळण केली असून पालिकेने केलेला रस्त्यांच्या पृष्ठीकरणाचा प्रयोग पुरता फसला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडून डांबरमिश्रित खडी अस्ताव्यस्त पसरली असून त्यामुळे अपघातांना आयते आमंत्रण मिळू लागले आहे. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असताना शहरातील खड्डे डोके वर काढू लागल्याने गणरायाचे आगमन चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच होण्याची चिन्हे आहेत.

पावसाळ्यापूर्वी महापालिकेने मोठय़ा प्रमाणावर रस्ते आणि मुख्य चौकांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेतली होती. काही ठिकाणी तातडीने डांबराच्या साह्याने पृष्ठीकरण करून रस्ता गुळगुळीत करण्याचा प्रयोग करण्यात आला. रस्ते विभागाकडे प्रकल्प रस्त्याची, तर विभाग कार्यालयांकडे अन्य रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तसेच रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत याची लेखी हमी देण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना दिले होते. ही कामे पूर्ण झाल्यानंतर गुळगुळीत रस्ते पाहून मुंबईकर सुखावले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची दैना उडाली आहे. जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडू लागले असून डांबरमिश्रित खडी अस्ताव्यस्त पसरू लागली आहे. मुंबई शहरातून पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या दिशेने जाणाऱ्या काही रस्त्यांवर पावसाच्या तडाख्याने खड्डे पडले असून त्याचा फटका वाहतुकीला बसू लागला आहे. पश्चिम उपनगरातील एस. व्ही. रोड, शीला रहेजा मार्ग, कार्टर रोड क्रमांक १, कार्गो रोड, मरोळ मरोशी रोड आदी खड्डय़ांमध्ये गेले आहेत.

पूर्व मुक्त मार्गावरून चेंबूरच्या दिशेला उतरल्यानंतर रस्त्यावर खड्डे पडले असून खड्डय़ांमधून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणच्या उड्डाणपुलांजवळ कामे सुरू आहेत. त्यामुळे पत्रे लावण्यात आले आहेत. यामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. ‘पांजरापोळ सर्कल परिसरात पडलेल्या खड्डय़ांबाबत अनेक वेळा पालिकेला माहिती देण्यात आली. मात्र पालिकेकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. दिवसभर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एका वेळी चार ते पाच वाहतूक पोलिसांना उभे राहावे लागते, असे वाहतूक पोलीस शिपाई(ट्रॉम्बे) चंद्रकात शिंदे यांनी सांगितले. तर काही दिवसांपूर्वीच चेंबूर आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आले होते. मात्र दोन दिवसांच्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. येत्या दोन दिवसात संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करायला सांगून ते खड्डे भरले जातील, असे पालिकेच्या एम-पश्चिम विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त हर्षद काळे यांनी सांगितले.

येत्या शुक्रवारी गणेशोत्सव सुरू होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तसेच घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. मात्र पावसाच्या तडाख्यात झालेल्या खड्डेमय मार्गातूनच गणेश आगमनाच्या मिरवणुका काढाव्या लागणार आहेत. तर गणेश विसर्जनाच्या मार्गातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे उंच गणेशमूर्ती विसर्जनासाठी विसर्जनस्थळी घेऊन जाताना कार्यकर्त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पालिकेने तातडीने विसर्जन मार्गातील खड्डे बुजवावे, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून करण्यात आली आहे.