घाटकोपर-अंधेरी रस्त्याची दुरवस्था; पेव्हर ब्लॉक्समुळे निम्मा रस्ता उखडलेलाच; पावसाळ्यात मुंबईकरांसाठी दु:स्वप्न ठरणार

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील सर्व रस्ते रहदारीच्या दृष्टीने चकाचक केल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेला मुंबईतील पहिल्यावहिल्या मेट्रोच्या खालून जाणाऱ्या घाटकोपर-अंधेरी या अक्षरश: चाळण झालेल्या रस्त्याचा मात्र विसर पडला आहे. साकीनाका ते पश्चिम द्रुतगती महामार्ग यांदरम्यान या रस्त्यावर दोन्ही बाजूंना प्रचंड खड्डे पडले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर दर दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यातच पावसाळ्यात या रस्त्यांतील खड्डय़ांमध्ये पाणी साचल्यावर हा रस्ता मुंबईकरांसाठी दु:स्वप्न ठरणार आहे.

मुंबईमधील रस्ते खड्डय़ांसाठी प्रसिद्ध आहेत. पालिकेने सातत्याने रस्त्यांची कामे करूनही अनेक रस्त्यांवरच्या खड्डय़ांचे प्रमाण कमी झालेले नाही. घाटकोपर आणि अंधेरी यांदरम्यानचा रस्ता मुंबई मेट्रोवनच्या बांधकामासाठी एमएमआरडीए आणि रिलायन्स मुंबई मेट्रोवन प्रा. लि. यांच्याकडे दिला होता. मेट्रोने बांधकाम झाल्यानंतर हा रस्ता जसा होता तसा बनवून पालिकेकडे सुपूर्द केला. मात्र सध्या या रस्त्याची अवस्था प्रचंड बिकट आहे.

पवई तसेच कुर्ला येथून साकीनाक्याला अनेक वाहने या रस्त्यावर येऊन मिळतात. त्याचप्रमाणे पुढे आंतरराष्ट्रीय विमातनळावरून येणाऱ्या वाहतुकीची भर या रस्त्यावर पडते. त्याशिवाय घाटकोपर ते अंधेरी या दरम्यानची वाहनेही या रस्त्यावर असतात. त्यामुळे हा रस्ता दिवस-रात्र वाहनांनी व्यापलेला असतो. गर्दीच्या वेळी तर या रस्त्यावर २०० मीटरचे अंतर कापण्यासाठी २०-२० मिनिटांचा कालावधी जातो. त्यातच या रस्त्यावर सध्या प्रचंड खड्डे असल्याने वाहतूक कोंडीबरोबरच या खड्डय़ांचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.

हा संपूर्ण रस्ता सिमेंट-काँक्रीटचा बनवण्यात आला आहे. मात्र काही कामांसाठी हा रस्ता खोदल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी ठिकठिकाणी पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात आले आहेत. विशेषत: चौकांच्या ठिकाणी हमखास हे पेव्हर ब्लॉक्स आहेत. हे पेव्हर ब्लॉक्स उंचसखल झाले असून त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच गटारांच्या झाकणांच्या आसपासही खड्डे झाल्याने दुचाकीस्वारांचा अपघात होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. पावसाळ्यात हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याबाबत पालिकेचे मुख्य अभियंता (रस्ते वाहतूक) संजय दराडे यांच्याशी संपर्क साधला असता या पदी नुकतीच नियुक्ती झाली असल्याने आपल्याला याबाबत माहिती घ्यावी लागेल, असे उत्तर त्यांनी दिले.