मुंबईकरांना खड्डेविरहित, चकचकीत रस्ते देण्याचे आश्वासन देऊन तीन वर्षांत साडेसात हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची बांधणी केल्यानंतरही प्रत्यक्षात रस्ते प्रकल्पांचा गाडा अडलेलाच आहे. २०१४- १५ या आर्थिक वर्षांत २,३०० कोटी रुपयांची तरतूद करूनही आतापर्यंत केवळ ११०० कोटी रुपयांचा प्रकल्प मार्गी लागलेला आहे. मात्र तरीही पालिकेने रस्त्यांचे घोडे पुढे रेटत आणखी ३,२०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय कागदावर तरतूद केली असून सागरी किनारा रस्ता व गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम या वर्षांत पुढे नेण्याचे ठरले आहे. 

गेल्या वर्षभरात ३१४ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून ५७४ रस्त्यांची कामे मार्गी लागणे बाकी आहे. त्यासाठी ११०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र डांबरी व सिमेंटचे रस्ते सुधारण्यासाठी या वर्षीही भरीव तरतूद आहे. सागरी किनारा रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) पर्यावरणीय मान्यतेच्या अभावी अनेक वर्षे रखडला आहे. मात्र केंद्रातील सत्ताबदलानंतर त्याला मान्यता मिळण्याची दारे खुली झाली असून या रस्त्यासाठी पालिकेने २०० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. आरे कॉलनी येथील रस्ता पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता बांधण्यासाठी ३०० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. वांद्रे ते दहिसरमधील २० किलोमीटर लांबीचे एस. व्ही. रोड तसेच लिंक रोड, फ्री प्रेस जर्नल मार्ग, ए. एस. डिमेलो मार्ग, जी. डी. आंबेकर मार्ग, आचार्य दोंदे मार्ग अशा मोठय़ा रस्त्यांची सुधारणा येत्या आर्थिक वर्षांत सुरू होईल. सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी १,१२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १,८५४ कोटी रुपये खर्च करण्यात येतील.

पदपथाला चालना
रस्त्यांच्या पदपथांची रुंदी दीड ते तीन मीटर ठेवण्यात येणार असून पृष्ठभाग समपातळीत असेल. पदपथाची रस्त्यांपासूनची उंची १५ सेंटीमीटर ठेवली जाईल. त्याचप्रमाणे वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा कठडे आणि लोखंडी खांब बसविले जातील.

पुलांसाठी ६५७ कोटी रुपये
मालाड येथील मीठ चौकी, गोरेगाव येथील बांगूर नगरमध्ये नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. पुलांची सविस्तर यादी व त्यांच्या स्थितीचे मूल्यमापनासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय चर्नीरोडजवळील पादचारी पुलाचे पुनर्बाधकाम, जुहू बीच, इस्माइल युसूफ महाविद्यालय ते जोगेश्वरी पश्चिमेकडील एस. व्ही. रोडपर्यंतच्या स्कायवॉकचे बांधकाम हाती घेण्यात येईल.
शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे बांधकाम करून दिल्यानंतर आता अखंडज्योतीसाठी लागणारे इंधन तसेच त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही पालिकेने स्वीकारली आहे. पुढील पाच वर्षांसाठी महानगर गॅस लिमिटेडकडून इंधनपुरवठा केला जाणार असून त्याचे शुल्क तसेच देखभालीचा खर्च यासाठी पालिकेने येत्या आर्थिक वर्षांत ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
जलवहन व्यवस्थेच्या बळकटीसाठी
जलवहन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मरोशी ते रुपारेल महाविद्याल, गुंदवली ते भांडुप संकुल, पवई ते वेरावली व पवई ते घाटकोपर, चेंबूर ते ट्रॉम्बे जलाशय आणि चेंबूर ते परेल (वडाळामार्गे) या बोगद्यांची कामे प्रगतिपथावर असून त्यासाठी ५१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीोहे. जलवितरण प्रणाली बळकट करण्यासाठी जुन्या तानसा जलवाहिन्या बदलण्याचे कामही मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आले असून त्यासाठी १५८ कोटी रुपयांची तरतूद आहे. त्याचबरोबर जलवाहिन्यांतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी ८०.५० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
मुंबई मलनि:सारण प्रकल्प
मलवाहिन्यांतून वाहणाऱ्या मलजलामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा प्रकल्पाबरोबर मलनि:सारण सुविधांमध्येही वाढ करण्याची गरज आहे. त्यामुळे पालिकेने मुंबई मलनि:सारण प्रकल्प टप्पा-२ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एकूण १०,६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विविध ठिकाणचे सूक्ष्म बोगदे आणि खुल्या चर पद्धतीने मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठी १४६.२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

क्षयरोगाच्या आयसीयुसाठी एक कोटी, स्वच्छतेसाठी मात्र १३ कोटी रुपये
शिवडी येथील पालिका रुग्णालयात अतिदशता विभाग सुरू करण्याची मागणी सुरू होती. त्याबाबत पालिकेने विचार केला असून ११ खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी पालिकेने या आर्थिक वर्षांत एक कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. त्याचवेळी हे रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी खासगी संस्थेला १३ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रुग्णालयाच्या परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. रुग्णालय, आवार, शौचालये स्वच्छ ठेवणे व त्याची नियमित देखभाल करण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.