‘सिंघम’ अजय देवगणच्या घरातून त्याच्या बायकोचे म्हणजेच काजोलचे दागिने चोरणाऱ्या दोन नोकरांना अटक करण्यात जुहू पोलिसांना यश आले आहे. ‘करवाचौथ’च्या दिवशी म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी ही चोरी उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोघांच्या घरी काम करणाऱ्या नोकरांचा माग काढत त्यांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.
२२ ऑक्टोबरला आपल्या सौभाग्य व्रतासाठी काजोल तयार होत होती. त्या वेळी आपले कपाट कोणी तरी विस्कटून त्यातील १७ बांगडय़ा गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले. यापैकी बऱ्याच बांगडय़ा अजयनेच तिला भेट म्हणून दिल्याने काजोलचा अधिकच हिरमोड झाला होता. या बांगडय़ांची किंमत अंदाजे ५ लाख रुपये एवढी आहे.
दरम्यान, अजय आणि काजोलच्या घरी काम करणारे गायत्री देवेंद्र आणि संतोष पाण्डे हे दोन नोकर गायब झाल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्वरित जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या दोघांचेही पत्ते देवगण परिवाराकडे नसल्याने पोलिसांना तपास करणे अधिकच जिकिरीचे होते. मात्र इतर नोकरांची सखोल चौकशी केली असता पोलिसांना या दोघांचे पत्ते सापडले. पोलिसांना दोघांनाही त्यांच्या घरातून अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला.
काजोल आणि अजय यांच्या घरी चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २००८ मध्येही त्यांच्या घरी नोकराने चोरी केली होती. या नोकराला पुढे पोलिसांनी छत्तीसगढ येथून अटक केली होती.