कळंबोली येथील सायन मार्गावर खाजगी वाहनात बसलेल्या सहप्रवाशाला मारहाण करून त्याच्या डोळ्यात मिरपूड टाकून लुटणाऱ्या आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जबलपूर येथून पोलिसांनी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले असून चोरीचे तब्बल १ किलो सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार्, संतोष मोतीलाल मुरकुंबी (वय ४४, रा. बेळगाव) हे ५ नोव्हेंबर रोजी पनवेलहून बेळगावला एका खाजगी वाहनांतून निघाले होते. कळंबोली येथील सायन पनवेल या मार्गावर रस्त्यावर रात्री पावणे नऊच्या सुमारास अनोळखी सहप्रवाशांनी मुरकुंबी यांना मारहाण केली व त्यांच्या डोळ्यात मिरची पूड घातली आणि त्यांच्या शर्टच्या आतील जॅकेट कापून त्यातील २० सोनसाखळया काढून घेतल्या. या सोनसाखळ्यांचे वजन १ हजार ६९० ग्राम इतके होते. तसेच त्यांच्याजवळील १० हजार रुपयांची रोकड व २ किंमती मोबाईल असा एकूण ५० लाख ७० हजार ६९० रुपये किमतीचा ऐवज या चोरट्यांनी चोरुन नेला होता.

सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपींच्या वाहनांचा क्रमांक मिळवून आरोपीचा तपास घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वाहनाचा मालक मध्य प्रदेशातील असल्याचे उघड झाले. या गुन्ह्यातील आरोपींनी अगोदरही अशा प्रकारचे गुन्हे केल्यामुळे त्याची तपशीलवार फोटोसहित माहिती नवी मुंबई पोलिसांकडे होती, या माहितीच्या आधारे त्यांनी आरोपींचा माग सुरु केला होता.

पोलिसांना चकवण्यासाठी हे आरोपी वारंवार रेल्वे गाड्या बदलत होते. मात्र, आरोपी शेवटी जबलपूर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथक आरोपींच्या आधीच जबलपूर येथे पोहचले. त्यानंतर जबलपूर रेल्वे पोलिसांच्या मदतीने ७ नोव्हेंबरला सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे.