रात्रीच्या प्रवासादरम्यान द्रुतगती महामार्गावर थांबलेल्या प्रवाशांना जबर मारहाण करून लुटण्याच्या घटना वाढत चालल्या होत्या. गाफील असलेल्या प्रवाशांवर अचानक हल्ला व्हायचा आणि त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू आणि रोकड लुटून दरोडेखोर पसार होत. दोन वर्षांत अशा अनेक गुन्ह्य़ांची नोंद झाली होती. अखेर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

सोलापूर येथे राहणारे संतोष अप्पाराव बिराजदार नेहमीप्रमाणे आपली गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील सावरोली टोलनाका त्यांनी नुकताच सोडला होता. पहाटे पाच-साडेपाचची वेळ होती. रस्त्यावर बऱ्यापैकी अंधार होता. प्रातर्विधीसाठी त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. आपल्यावर कुठले संकट ओढवणार आहे, याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. अचानक तीन जण त्यांच्या जवळ आले. काही कळण्याच्या आत त्यांना बेदम मारण्यास सुरुवात केली. भांबावलेले संतोष मदतीची याचना करत होते. मात्र जवळपास कोणीच नव्हते. संतोष यांना मारहाण करून झाल्यानंतर तिघांनी त्यांच्याजवळील साडेदहा हजार रुपयांची रोकड काढून घेतली. त्या व्यतिरिक्त संतोष यांच्याकडे काहीच नव्हते. त्यामुळे त्यांना पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारून तिन्ही दरोडेखोर पळून गेले.

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
heavy vehicles ban on Mumbai Pune Expressway for three days
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल
Looting on the Mumbai Ahmedabad highway by Angadian
महामार्गावर अंगाडियांकडून सव्वा पाच कोटींची लूट; धारावीचा कुख्यात डॉनसह चौघांना अटक

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे धास्तावलेल्या संतोष यांना काहीच सुचले नाही. वेदना सोसत त्यांनी गाडीसह कसेबसे खालापूर शहर गाठले. तेथील दवाखान्यात प्रथमोपचार झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी तक्रार नोंदवली.

द्रुतगती मार्गावर प्रवाशांना मारहाण करून लुटण्याचा हा दोन वर्षांतील चौदावा प्रकार होता. त्यामुळे सातत्याने घडणाऱ्या या गुन्ह्य़ांना रोखणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. द्रुतगती मार्गावर थांबू नका, असे आवाहन करणारे फलक पोलिसांनी ठिकठिकाणी लावले होते. मात्र केवळ फलक लाऊन हा प्रश्न सुटणार नव्हता याची जाणीव पोलिसांना होती. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दोन स्वतंत्र पथके नेमली. यात खालापूर पोलीस स्टेशनचे एक पथक आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे दुसरे पथक तयार करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांना या प्रकरणाचा दैनंदिन आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सर्व घटनांमधील साधर्म्य लक्षात घेऊन या प्रकरणामागे संघटित टोळी कार्यरत असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी चाचपणी सुरू केली. स्थानिक गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांची चौकशी सुरू  केली. दुसरीकडे, घटनास्थळाजवळील परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली. घटना घडली त्या वेळेसचे मोबाइल टॉवर लोकेशन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठलाही ठोस पुरावा त्यांच्या हाती लागत नव्हता.

अशा पद्धतीने प्रवाश्यांना लुटताना आरोपी कुठलाही पुरावा मागे ठेवत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व घटना महामार्गावर घडल्या होत्या. त्यामुळे आरोपींना वेगाने पसार होणे सहज शक्य होते. त्यामुळे तपासाला दिशाच मिळत नव्हती, गुन्ह्य़ाची उकल करणे दिवसेंदिवस कठीण होत जात होते.

अखेर खबऱ्यांना हाताशी धरून या परिसरातील वाडय़ा वस्त्यांवर पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. यात खालापूरजवळील निंबाडे दांडवाडी आदिवासी वाडीवर संतोष यांनी वर्णन केलेल्या एका आरोपीसारखी दिसणारी व्यक्ती राहात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला दिशा सापडली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पी. के. दोरे आणि बी. डी. कराळे यांनी त्या ठिकाणी जाऊन वसंत दामू वाघमारे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला या गुन्ह्य़ाशी आपला काहीच संबंध नसल्याचा आव वसंतने आणला. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली आणि आपल्या साथीदारांची माहितीही दिली.

वसंत हाती लागल्याचे कळताच त्याचे अन्य साथीदार सतर्क होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाली करत वनवे आदिवासी वाडी येथून मारुती गणपत धारपवार आणि शिरवली आदिवासी वाडी येथून रोहिदास देहू पवार या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिघांनी मिळून यापूर्वीही अशाच पद्धतीने अनेकांना लुटल्याची कबुली दिली.

रात्रीच्या वेळी महामार्गावर थांबणाऱ्या गाडय़ांवर हे तिघे लक्ष ठेवून असायचे. एकांतात थांबणाऱ्या गाडय़ांवर जाऊन हल्ला करायचे व प्रवाशांना लुटायचे. गेल्या दोन वर्षांत रसायनी खालापूर आणि खोपोली त्यांनी अशा प्रकारे १४ जणांना लुटल्याचे कबूल केले. त्यामुळे एका लुटीचा तपास करताना पोलिसांना १४ गुन्ह्य़ांची उकल करता आली.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी, खालापूरचे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकुरे, बी. डी. कराळे, पी. डी. दोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या तिघांवरही संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम अर्थात मोक्काअंतर्गत आता कारवाई केली जात आहे. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हर्षद कशाळकर harshad.kashalkar@expressindia.com