सराफाच्या दुकानात दरोडा घालण्यासाठी आलेल्या पाच जणांना अटक करून खार पोलिसांनी दरोडय़ाचा कट उधळला. या टोळीकडून दोन पिस्तूल, देशी कट्टा आणि दरोडय़ासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे हे सोमवारी गस्तीवर असताना लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर दरोडा घालण्यासाठी एक टोळी येणार असल्याची खबर त्यांना मिळाली. सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बरगुडे आदींच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा लावला आणि सरवर खान (३१), मोहम्मद खान (३६), सिल्वागणपती कोनार (३१) आणि महेंद्र माणिकलाल उर्फ छारा (४५) या दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, एक सिंगल बोअर गन व १९ जिवंत काडतुसे, चिकटपट्टीचे बंडल, मिरची पावडर, लोखंडी कटावणी आदी दरोडय़ासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या टोळीचा म्होरक्या सरवर खान याच्याविरोधात जबरी चोरी, हत्या, दरोडा आदी गुन्ह्यांची नोंद आहे. तर मक्सुद खान याच्यावरही विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. खार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बोरसे, प्रशांत मोरे, दळवी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.