‘ट्राय’च्या नव्या नियमांनुसार ग्राहकांना पसंती हक्क नाहीच; वाहिन्यांचे तयार संच घेण्याच्या सक्तीमुळे खिशाला भुर्दंड

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) टीव्ही ग्राहकांना आपल्या पसंतीच्या वाहिन्या निवडून तेवढय़ाच वाहिन्यांचे शुल्क भरण्याचा अधिकार दिला असला तरी केबलचालकाची सेवा घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना महाग पडत आहे. मुंबईसह राज्यभरातील बहुतांश केबलचालकांनी ग्राहकांना हा अधिकार देण्याऐवजी स्वत:च वेगवेगळे संच (पॅकेज) तयार करून ग्राहकांकडून त्यानुसार जादा शुल्क घेण्यास सुरुवात केली आहे.

‘ट्राय’ने टीव्ही वाहिन्यांच्या निवडीसंदर्भात लागू केलेले नियम १ फेब्रुवारीपासून अमलात आले. या नियमानुसार केबल आणि डीटीएच सेवांसाठी वाहिन्यांची समान दरप्रणाली लागू करण्यात आली. ग्राहकांनी त्यांना हव्या त्याच वाहिन्या निवडून त्यानुसार शुल्क द्यावे, अशी ही योजना आहे. या नव्या नियमानुसार टाटा स्काय, डिश टीव्ही यांसारख्या डीटीएचचालकांनी ग्राहक सेवा देण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक केबलचालकांनी मात्र त्यांच्या ग्राहकांना नव्या नियमानुसार सेवा देण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे मोजक्याच वाहिन्या पाहणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार त्या निवडताच येत नाही आहेत. दुसरीकडे शुल्कही अवाच्या सवा वाढले आहे.

मोजक्याच वाहिन्या पाहणाऱ्या आणि त्या निवडू इच्छिणाऱ्या ग्राहकांचे दर नव्या नियमामुळे नक्कीच कमी झाले असते. मात्र अनेक केबलचालकांनी ४०० ते ६०० रुपयांपर्यंतचे निरनिराळे पॅकेज घेण्याची सक्ती ग्राहकांना केल्याने हा अधिकार कागदावर आहे. विविध वाहिन्यांचे पॅक एकत्र केल्याने किमती वाढल्या आहेत. त्यात ‘नेटवर्क कॅपॅसिटी’ शुल्काचा बोजा ग्राहकांना सहन करावा लागत आहे. स्थानिक केबलचालकांकडून सेवा घेणाऱ्या ग्राहकांना सध्या मुंबईच्या विविध भागांत एसडी वाहिन्यांसाठी ३००, ३५०, ४००, ४५०, ५०० ते ५५० महिना दर आहेत. तर एचडी वाहिन्यासांठी ५५०, ६०० पासून ते ७००, ८०० रुपयांपर्यंत मासिक शुल्क भरावे लागत आहे.

याबाबत ‘केबलचालक संघटने’चे विनय पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी चालकांना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. ‘स्थानिक केबलचालकांकडून आतापर्यंत ३५ ते ३८ टक्के ग्राहकांना नव्या नियमानुसार सेवा देण्यात आली आहे; परंतु १०० टक्के ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत सेवा देणे कठीण आहे. स्थानिक केबलचालकही तांत्रिकदृष्टय़ाा सक्षम नाहीत. त्यामुळे पॅकेज देणे सोयीचे होते, असे त्यांनी सांगितले.

तांत्रिक अडचणी कायम

एमएसओंची (मल्टी सिस्टीम ऑपरेटर) ‘सव्‍‌र्हर सिस्टीम’ अद्ययावत नसल्यामुळे तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, असे केबलचालकांचे सुरुवातीपासून म्हणणे होते. प्रक्षेपण कंपन्यांनी ग्राहकांना सवलती देताना ५० ते ६० पॅकेजेस केलेले आहेत. त्यांच्या वाहिन्यांच्या किमती आणि पॅकेजच्या किमती सतत बदलत राहतात. त्यांची निवड करताना ग्राहकांचाही गोंधळ उडत आहे.

नव्या पॅकेजनुसार सेवा देणे एमएसओंना शक्य नाही. ‘सेव्हन प्लस वन’ ही सर्वात जास्त क्षमतेची तांत्रिक व्यवस्था पॅकेज ‘लोड’ करण्यासाठी लागणार आहे; पण तीही सातत्याने कोसळून (हँग) पडते. कित्येक एमएसओंनी त्यांच्या संकेतस्थळांवरून ‘अलाकार्टे’ हा वाहिन्या निवडण्याचा पर्यायच काढून टाकला आहे. त्यामुळे स्थानिक केबलचालकांकडून ग्राहकांना त्यांना हव्या त्या वाहिन्या निवडता येत नाहीत. काहींनी जुन्या पॅकेजनुसारच फेब्रुवारी आणि मार्चचे शुल्क घेतले आहे. ते दर एप्रिलपासून मात्र वाढणार आहेत.

आमच्याकडे ग्राहकांच्या तक्रारी अद्यापपर्यंत आलेल्या नाहीत. मात्र, ‘अलाकार्टे’ वाहिन्या निवडायच्या की वाहिन्यांचे एकत्रित पॅकेज निवडायचे, असा संभ्रम बहुतांश ग्राहकांत आहे.

– वर्षां राऊत, प्रमुख, मुंबई ग्राहक पंचायत

आमच्या भागात केबलचालकांकडून सेवा घेणाऱ्या ग्राहकांना आधी देत होतो त्यापेक्षा १०० रुपये वाढीव शुल्क द्यावे लागत आहे. वाहिन्या निवडीचा पर्यायच दिला नसून चार-पाच पॅकेज बनवून त्याचेच पर्याय दिले. निवडीचा पर्याय न मिळाल्यामुळे आम्हाला ३७५ रुपयाचे पॅकेज निवडावे लागले.

– धनंजय भोईर, भाईंदर

आम्ही आधी केबलचे ३५० रुपये मासिक शुल्क भरत होतो, पण आता आम्हाला महिन्याचे ४५० रुपये द्यावे लागत आहेत. गेल्या आठवडय़ात केबलचालकांनी अजून एक  फॉर्म आणून दिला आहे. त्यात ४४८ रुपयाचे पॅकेज देण्यात आले असून ही वाढ परवडण्यासारखी नसली तरी त्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही.

– रिद्धी सांवत, मुंबई सेंट्रल

आमच्या घरी आम्हाला मोजक्याच १८ वाहिन्या घ्यायच्या होत्या. पण त्यांची निवड करू न मूलभूत १३० रुपयांतील १०० वाहिन्या आणि २० रुपये नेटवर्क कॅपॅसिटी शुल्क असे सगळे मिळून शुल्क ३०० ते ३५०च्या आसपासच होत होते. परंतु आता केबलचालकाने दिलेले पॅकेज ३७५ रुपयाचे आहे. आधी आमच्याकडे एचडी वाहिन्या होत्या, पण त्याचे महिना सर्वसाधारण शुल्क ६०० रुपयांपर्यंत गेल्याने एसडी वाहिन्यांच्या पॅकेजची निवड करून ३७५ भरावे लागत आहेत.

– स्मृती कुळकर्णी, ग़्राहक बोरिवली पूर्व

‘बेस्ट फिट’ योजनेचा फटका?

८ फेब्रुवारीपर्यंत ज्या ग्राहकांनी वाहिन्या निवडल्या नव्हत्या, त्यांना ‘बेस्ट फिट’ योजनेत वाहिन्यांचा संच तयार करून देण्याची सूचना ट्रायने केली होती. तसेच एमएसओंकडून नव्या नियमाची ७५ टक्के अंमलबजावणी झालेली अशीही ‘ट्राय’कडे आकडेवारी आहे. ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर केबलचालकांच्या कुठल्याही तक्रारी आमच्याकडे आल्या नसल्याचे ‘ट्राय’चे प्रवक्ते अनिल भारद्वाज यांनी लोकसत्ताला सांगितले. परंतु नव्या नियमानुसार ग्राहकांना पसंतीच्या वाहिन्या निवडता येत नाहीत, यावर समाधानकारक उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.