हिरे व्यापाऱ्यांची गाडी भर रस्त्यात अडवून ६ कोटींचे हिरे लुटल्याची धक्कादायक घटना बोरीवलीत शुक्रवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे कंपनीच्याच चालकानेच आपल्या साथीदारांसह ही लुट घडवून आणली.
 जे. के. लॉजिस्टिक कंपनीचे सोने आणि हिरे असलेले दोन पार्सल शुक्रवारी दुपारी गुजरात एक्सप्रेसने बोरीवली स्थानकात आणण्यात आले. हे पार्सल वांद्रे कुर्ला संकुलातील जे.के. लॉजिस्टिक कंपनीच्या कार्यालयात नेले जाणार होते. कंपनीचे पर्यवेक्षक रमेशकुमार गुप्ता, एक सुरक्षारक्षक आणि दोन कर्मचारी सोबत होते. या पार्सलमध्ये तीन किलो सोने तसेच काही हिरे होते. एस. आर. सिक्युरिटीज कंपनीकडे हे पार्सल नेण्याचे कंत्राट देण्यात आले होते. लॉजिस्टिक कंपनीच्या बोलेरो गाडीतून हे सर्व कर्मचारी सोने आणि हिऱ्याचे पार्सल घेऊन निघाले. दुपारी साडेतीनच्या सुमारास बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ गाडी आली असता चालक उदयभान सिंग याने गाडी खराब झाल्याचा बहाणा करून खाली उतरला. त्याचवेळी तेथे दबा धरून बसलेले चौघे चाकूचा धाक दाखवत गाडीत शिरले. त्यांनी आतल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. या सर्वाचे गाडीतच हात पाय बांधून ठेवले आणि चाकूचा धाक दाखवत गाडी विरारच्या दिशेने नेली.
 विरार जवळील वज्रेश्वरी येथे या आरोपींनी सर्वाना गाडीतच कोंडून ठेवले. नंतर चालक उदयभान सिंगसह पाचही जण पळून गेले. गाडीतल्या कर्मचाऱ्यांनी गाडीतल्या आतल्या बाजूला ठोकत मदतीसाठी प्रयत्न केला. रात्री आठच्या सुमारास तो आवाज ऐकून परिसरातल्या लोकांनी पोलिसांना बोलावून त्यांची सुटका केली. हे सर्व कर्मचारी सहा तास गाडीत होते. सुरवातीला हा गुन्हा विरार पोलीस ठाण्यात दाखल होता. नंतर तो कस्तुरबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

चालक सूत्रधार
कंपनीचा चालक उदयभान सिंग हा या प्रकरणातला मुख्य सूत्रधार आहे. तो चारच महिन्यापूर्वी चालक म्हणून कामाला लागला होता. २००२ साली बोरीवलीत एका व्यापाऱ्याची हत्या करून त्याच्याकडील ६८ लाखांचे हिरे लुटले होते. याप्रकरणी त्याला दोन वर्षांची शिक्षाही झाली होती. तो मुळचा उत्तरप्रदेशातील असून सध्या नालासोपारा येथे रहात होता. आम्ही अपहरण आणि दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत वरळीकर यांनी सांगितले. हिऱ्यांची किंमत ६ कोटींच्या वर असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.