मालाडमध्ये तिघा सराईतांना अटक; मुख्य रस्त्यांवरील दुकानांमध्ये चोरी

पर्यटकांसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा वापर करून चोरी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला मालाड पोलिसांनी रविवारी अटक केली. हे तिघे सराईत चोर असून त्यांना मानखुर्द येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. शरीफ शेख (२८), वसंत धोत्रे (२८) आणि शबन शहा (२८) अशी तिघा आरोपींची नावे आहेत. हे तिघे आरोपी सराईत चोर असून त्यांच्या नावावर अनेक चोरीच्या गुन्ह्य़ांची नोंद आहे. तिघे रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावरील दुकानांमध्ये चोरी करत असल्याचे समोर आले.

गेल्या आठवडय़ात मालाड पश्चिमेला असलेल्या एका आइस्क्रीम पार्लरमध्ये चोरी झाली. या घटनेत चोरांनी दुकानातून ५५ हजार रुपयांची रोकड चोरी केली. या घटनेचा तपास सुरू असताना आइस्क्रीम पार्लरजवळ असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक जीप संशयास्पद आढळून आली. त्या जीपच्या क्रमांकावरून त्याची माहिती आरटीओमधून काढण्यात आली. त्या जीपच्या मालकापर्यंत पोलीस पोहोचले. त्यानंतर त्या चोरांचा शोध लागला. या घटनेच्या चौकशीदरम्यान गोरेगाव, कांदिवली, मालाड, बोरिवली या पोलीस ठाण्यांतर्गत या चोरांनी वेगवेगळ्या पर्यटक वाहनांचा वापर करून अशाच प्रकारे चोरी केल्याची प्रकरणे समोर आली.

यातील आरोपी शबन हा पर्यटकांकरिता चालक म्हणून काम करतो. रात्रीच्यावेळी तो त्याच्या दोन साथीदारांसह पर्यटकांसाठीच्या वाहनांचा चोरीसाठी वापर करत असल्याचे तपासात उघड झाले. मालाड, कांदिवली व बोरिवली भागांत अशाच प्रकारे चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात चोरांनी वेगवेगळया पर्यटक वाहनांचा वापर केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आल्याचे मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर महाडिक यांनी सांगितले.