फायनान्स कंपनीचे ७० लाख रुपये घेऊन जात असलेली गाडी दादरमध्ये भररस्त्यात अडवून रोकड लुटल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. होंडा सिटीतून आलेल्या चार लुटारांनी गाडी अडवून शस्त्रांच्या सहाय्याने ही लूट केली. दादर पूर्वेच्या करिश्मा बारसमोर सकाळी १० च्या सुमारास हा थरार घडला.
‘भराणी ब्रदर्स अ‍ॅण्ड फायनान्स’ कंपनीचे ७० लाख रुपये कंपनीचा प्रकल्प मॅनेजर केतन याच्या दादरच्या सनशाइन प्लाझा येथील घरात ठेवण्यात आले होते. हे पैसे घेऊन बुधवारी सकाळी कंपनीचे कर्मचारी अश्विन राठोड व निलेश श्यामजी अन्य एका सहकाऱ्यासह ह्युंदाई गाडीतून दादर पूर्वेकडील कार्यालयाकडे निघाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून जात असलेली त्यांची गाडी करिश्मा बारसमोर आली असता मागून आलेल्या होडा सिटी गाडीने त्यांचा रस्ता अडवला. काही समजण्याच्या आतच होंडा सिटीतून उतरलेल्या चौघांनी चॉपर आणि रॉडच्या सहाय्याने ह्युंदाईच्या काचा फोडल्या. रिव्हॉल्वरचा धाक दाखवून गाडीतील रोकड घेऊन ते पसार झाले. अवघ्या दोन मिनिटांत हा संपूर्ण प्रकार घडल्याने गाडीतील कर्मचाऱ्यांना तसेच पादचाऱ्यांना चोरांना पकडता आले नाही. परंतु नागरिकांनी हल्लेखोरांच्या गाडीचा नंबर टिपून ठेवला होता. मात्र, ही गाडी चोरीची असावी, असा अंदाज आहे.
ज्या प्रकारे ही घटना घडली ते पाहता लुटारूंनी पद्धतशीर योजना बनविली असावी, असे भोईवाडा पोलिसांनी सांगितले. फायनान्स कंपनीच्या या व्यवहाराची त्यांना माहिती होती. हे ७० लाख रुपये गाडीच्या मागच्या सीटखाली दोन बॅगांत ठेवण्यात आले होते. हेही लुटारूंना माहीत होते. त्यामुळे लुटारू या कंपनीशी संबंधित असावेत किंवा येथूनच त्यांनी माहिती मिळाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टिने पोलीस तपास करत आहेत.