क्लिष्टता आणि आर्थिक अव्यवहार्यतेचा पेच

पालिकेचे राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय आणि वडाळा येथे उभारण्यात येणाऱ्या स्किल डेव्हलपमेन्ट सेंटरमध्ये ‘रोबोटिक सर्जरी’ विभाग सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, रुग्णालयांतील डॉक्टर्सना ‘रोबोटिक सर्जरी’चे प्रशिक्षण देण्याबाबत प्रशासनाने नन्नाचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे. प्रशिक्षणातील क्लिष्टता आणि आर्थिक व्यवहार्यता या कारणांमुळे प्रशिक्षणाचे घोडे विचार पातळीवरच अडले आहे.

मुंबई महापालिकेतर्फे चार वैद्यकीय महाविद्यालये चालविण्यात येत असून दर वर्षी सुमारे १०० हून अधिक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत आहेत. त्यांना अत्यावश्यक आणि नव्याने विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्य देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रोबोटिक सर्जरीचा वापर करण्यात येत आहे. पालिका रुग्णालयांमधील डॉक्टरांनाही रोबोटिक सर्जरीचे प्रशिक्षण दिल्यास त्याचा फायदा गोरगरीब रुग्णांना होऊ शकेल. त्यामुळे पालिकेने रोबोटिक शस्त्रक्रिया प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या प्रशिक्षण केंद्रांमध्ये पालिका रुग्णालयातील डॉक्टरांबरोबरच अन्य डॉक्टरांनाही प्रशिक्षण घेणे शक्य होईल, असेही मत काही व्यक्तींनी व्यक्त केले होते. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पालिका सभागृहात मांडलेली ठरावाची सूचना एकमताने मंजूर करून पालिका आयुक्तांकडे पाठविली होती.

या ठरावाच्या सूचनेवर प्रशासनाकडून आता तिसऱ्यांदा अभिप्राय सादर करण्यात आला.  रोबोटिक सर्जही परिणामांबाबत अध्यायन व समीक्षा पातळीवर असून ती अत्यंत खर्चीक आहे. त्यातील आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी अधिष्ठाता गट स्तरावर अभ्यास करण्यात येत असून त्याचे प्रशिक्षण क्लिष्ट असल्याने सर्वकष विचारविनिमय करून रोबोटिक सर्जरीची आवश्यकता व आर्थिक व्यवहार्यता पडताळूननिर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते.

नगरसेवकांनी हा अभिप्राय धुडकावून लावल्यानंतर पुन्हा एकदा प्रशासनाने आपला अभिप्राय सादर केला. पालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयात रोबोटिक सर्जरीचा विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून वडाळा येथे उभारण्यात येणाऱ्या स्किल डेवलपमेन्ट सेंटरमध्ये सिम्युलेटिंग लॅबसह रोबोटिक सर्जरी विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे दुसऱ्या अभिप्रयात नमूद करण्यात आले. मात्र प्रशिक्षणाबाबत कोणताच उल्लेख नसल्याने हाही अभिप्राय नगरसेवकांनी फेटाळून लावला.

अभिप्राय नगरसेवकांच्या कोर्टात

आता प्रशासनाने तिसऱ्यांदा अभिप्राय सादर केला आहे. रोबोटिक सर्जरीच्या क्लिष्ट प्रशिक्षणाबाबत विचारविनिमय करून आणि रोबोटिक सर्जरीची आवश्यकता व आर्थिक व्यवहार्यता पडताळून योग्य तो निर्णय घेणे उचित ठरेल असे अभिप्रायात म्हटले आहे. त्यामुळे नगरसेवक आता हा अभिप्राय स्वीकारतात की पुन्हा फेटाळतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.