सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर खंडाळ्याजवळ मोठ्या प्रमाणावर दरड कोसळ्याचे वृत्त आहे. अप आणि मिडल लाईनवर ही दरड कोसळल्याने लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी ही दरड कोसळल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. यामुळे कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस खंडाळा स्थानकात थांबवण्यात आली आहे.

दरड कोसळल्याने गेल्या दोन तासापासून कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस खोळंबली असून या मार्गावरील दरड कधीपर्यंत हटवली जाईल, याची माहिती मिळू शकलेली नाही. कालच या मार्गावर दरड कोसळली होती, ती हटवण्यासाटी ६ तासांचा कालावधी लागला होता. दरम्यान, रात्री १ वाजता या मार्गावरुन चेन्नई एक्स्प्रेस रवाना होणार आहे. मात्र, हा मार्ग पूर्णपणे ठप्प झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, दरड कोसळल्याच्या या ताज्या घटनेमुळे लोणावळा-कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे. लोणावळ्यापासून पुढे वाहतूक बंद असल्याने पुण्याहून लोणावळ्यापर्यंत गाड्या चालू आहेत, मात्र पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.