News Flash

केंद्राप्रमाणे कंपन्या विकून राज्याला पैसे मिळत नाहीत; रोहित पवारांचे चंद्रकात पाटलांना उत्तर

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी केली होती

पेट्रोलचे दर गगनाला भिडत आहेत. करोना काळत सामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्याची प्रक्रिया सुरूचं आहे. या महिन्यात १६ वेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल २९ पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी प्रतिलिटर महागले आहे. दरम्यान, पेट्रोल दरवाढीवरून आता राजकारण देखील पेटले आहे. सत्ताधारी केंद्र सरकारवर टीका करत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी केली होती. याला आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

रोहित पवार म्हणाले, “राज्याने पेट्रोलवरील कर कमी करण्याची मागणी काल राज्यातील भाजपच्या एका नेत्याने केली. पण २०१४ च्या तुलनेत कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्याने कमी झाल्या तरी २०१४ च्या तुलनेत केंद्राचा पेट्रोलवरील कर आज ३५०% नी वाढलाय. आज पेट्रोलवर केंद्राचा ३२.९० रुपये तर राज्याचा २८.३५ रुपये कर आहे. असं असताना या नेत्यांचं गणित कळत नाही. राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून/रिझर्व्ह बँकेकडून पैसे मिळत नाहीत. शेजारील राज्यांप्रमाणे वादळात हजारो कोटी रूपयाची मदतही मिळत नाही. हे वास्तव या नेत्यांनी समजून घेण्याची आणि राज्याच्या हितासाठी केंद्राकडं पाठपुरावा करण्याची गरज आहे”

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील

“जागतिक स्तरावर इंधनाची दरवाढ झाल्यामुळे देशातही दरवाढ होत आहे. काही राज्यांनी आपले कर कमी केल्याने तेथे दर कमी आहेत. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. त्यांनी टीका करू नये,” असे चंद्रकात पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पेट्रोलने गाठली शंभरी

पुणेकरांच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे. कारण पुण्यातल्या पेट्रोलच्या दराने आता शंभरचा आकडा पार केला आहे. फक्त पेट्रोलच नाही तर सीएनजी आणि डिझेलचे दरही कमालीचे वाढले आहेत. हा आकडा शंभरी पार करुन गेला असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

करोनाने हैराण झालेले पुणेकर पेट्रोल दरवाढीच्या नव्या संकटात सापडले आहेत. दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे आणि आज तर पेट्रोल थेट १००.१५ रुपयांवर पोहोचलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 12:34 pm

Web Title: rohit pawar reply to chandrakant patil on petrol price hike srk 94
Next Stories
1 ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत बसले; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर प्रहार
2 पेट्रोलने गाठली शंभरी; पुणेकरांचं पाकीट होणार अशक्त
3 “हा अजेंड्याचाच भाग!”; गंगेतील मृतदेहांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला गंभीर आरोप
Just Now!
X