लॉकडाउन बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून मुंबईतील लोकल सेवा हळूहळू सर्वांसाठी खुली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरूवातीला महिलांसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यावरून बराच विलंब झाला होता. राज्य सरकारनं दुसऱ्यांदा पत्र पाठवून रेल्वे मंडळाला आठवण करून दिली होती. महिलांसाठी रेल्वे सुरू झाल्यानंतर आता सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं पत्र पाठवलं आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याच मुद्यावरून आमदार रोहित पवार यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

”श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं ट्विट मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. तर स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात.” असं आमदार रोहित पवार म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनंही केंद्राशी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र अद्याप यावर निर्णय झालेला नाही. यावरून रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला.

दरम्यान, सर्वांसाठी उपनगरील लोकल सुरु करण्यावरुन मतभेद वाढल्यानंतर तणाव कमी करण्यासाठी पुढच्या आठवडयात राज्य सरकार आणि रेल्वेमध्ये बैठक होऊ शकते. गर्दी नियंत्रणासाठी राज्य सरकारला उपाय योजावे लागतील, त्याशिवाय २७.५ टक्के म्हणजे २२ लाख प्रवाशांनाच लोकलने प्रवास करता येईल, असं रेल्वेनं म्हटलं आहे. त्यावरुन नवीन वाद सुरु झाला आहे .

लॉकडाउन आधी दररोज ८० लाख प्रवासी उपनगरीय लोकलमधून प्रवास करायचे. करोना व्हायरसमुळे सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियम पाळणे आवश्यक असल्याने रेल्वेने प्रवासी संख्येवर मर्यादा घालण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या समस्येवर तोडगा काढण्याआधी रेल्वेला पाठवलेले पत्र लीक झाल्याबद्दल राज्य सरकारने नाराजी प्रगट केली आहे.

“राज्य सरकारने बुधवारी रेल्वे पाठवलेलं पत्र गोपनीय होतं. या पत्राची हँडडिलिव्हरी करण्यात आली होती. लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. असं या पत्रात म्हटलं होतं. आधीच्या पत्राप्रमाणे हे पत्र सुद्धा मीडियाला लीक झालं” असं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितलं. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.