केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे माजी प्रमुख राकेश कुमार यांना लाच दिल्याप्रकरणी ‘सिंघम रिटर्न्‍स’ या  प्रसिद्ध चित्रपटाचा निर्माता रोहित शेट्टी सीबीआय चौकशीच्या भोवऱ्यात सापडला आहे.
याप्रकरणी सीबीआयच्या दिल्ली मुख्यालयाला जानेवारीमध्ये शिफारसपत्र पाठविण्यात आले आहे. सीबीआय प्रवक्ते म्हणाले की, या प्रकरणाची आम्ही तपासणी करत असून संबंधितांची चौकशी सुरू आहे. याबाबत चित्रपट निर्माता रोहित शेट्टी आणि त्याच्या प्रवक्त्याकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या चित्रपटाला ८ ऑगस्ट २०१४ रोजी मान्यता प्रमाणपत्र देण्यात आले होते. १४ ऑगस्ट २०१४ रोजी संयुक्त अरब अमिरातमध्ये या सिनेमाचा प्रीमिअर झाला होता. त्यानंतर काही दिवसांनीच सीबीआयने राकेश कुमार, श्रीपती मिश्रा आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या सल्लागार समितीचे सदस्य सर्वेश जयस्वाल यांना दुसऱ्या लाचप्रकरणी अटक करण्यात आली होती. सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार सिंघम रिटर्न्‍स सिनेमाचे स्क्रिनिंग ७ ऑगस्ट २०१४ रोजी होणार होते. त्याआधी राकेश कुमार चित्रपट मंडळाच्या दोन सदस्यांना रिकाम्या अर्जावर सह्य़ा करण्याची जबरदस्ती करत होते. कुमार आणि हे सदस्य स्क्रिनिंग समितीत होते आणि त्यांनीच रोहित शेट्टीच्या सिनेमाला मान्यता प्रमाणपत्र दिले होते.