डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज बौद्ध धम्माची दीक्षा घेणार
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील आत्महत्या केलेला बुद्धिमान दलित विद्यार्थी रोहित वेमुला याची आई राधिका वेमुला यांनी गुरूवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी मुंबईत हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे सबंध देशातील राजकारण व समाजकारण ढवळून निघाले होते. हैदराबाद विद्यापीठातील रोहित हा पीएचडीचा बुद्धिमान विद्यार्थी होता. विद्यार्थी संघटनांच्या राजकीय संघर्षांतून त्याला आत्महत्या करावी लागली, असा आरोप करण्यात आला होता. त्याच्या मृत्यूबद्दल केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय व स्मृती इराणी यांच्यावर आरोप झाले होते. देशभरातील आंबेडकरवादी व डाव्या संघटनांनी त्याविरोधात आंदोलने केली होती.
रोहित हा सुरुवातीला स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता होता. मात्र त्या संघटनेशी जातिव्यवस्थेच्या प्रश्नावर त्याचे मतभेद झाल्याने त्या संघटनेचा राजीनामा देऊन तो विद्यापीठातील आंबेडकर स्टुडंट असोसिएशनध्ये सहभागी झाला. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फाशी झाल्यानंतर, फाशीच्या शिक्षेच्या विरोधात विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित चर्चासत्रावरून वाद पेटला आणि त्यातून रोहितच्या आत्महत्येसारखी दुर्दैवी घटना घडली. रोहितची आई राधिका ही मूळची माला जातीतील. हिंदू धर्मात ही जात अस्पृश्य मानली जाते.

देशातील जातिव्यवस्थेचा बळी ठरलेल्या रोहितच्या आईनेही आता हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आहे, तशी त्यांनी स्वत:हून इच्छा व्यक्त केली आहे.
– भीमराव आंबेडकर, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय बौद्ध महासभा