पर्यटकांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या खोपोली येथील ‘अ‍ॅडलॅब इमॅजिका’ या थीम पार्कमध्ये बुधवारी झालेल्या विचित्र अपघातात दोन महिला जखमी झाल्या. रॉबिनहुड राइडची मागची ट्रॉली तुटून पर्यटकांच्या अंगावर घसरल्याने हा अपघात घडल्याची माहिती अ‍ॅडलॅबमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिली. मात्र अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी हा पर्यटकांचा हलगर्जीपणा असल्याचे जाहीर केले.
या थीम पार्कमधील रॉबिनहुड राइडमध्ये ७ ट्रॉलीज आहेत. त्यात प्रत्येकी चार जण असे एकूण २८ जण बसतात. रॉबिनहुड ट्रॉली सुरू असताना शेवटची ट्रॉली पुढील सहा ट्रॉल्यांवर घसरल्याने हा अपघात घडला. काही वेळानंतर ट्रॉलीला ब्रेक लावून नियंत्रणात आणण्यात आले. मात्र अपघातामध्ये दोन महिला जखमी झाल्या. पूर्णिमा राठी (वय ३२), ममता राठी (वय १६) अशी जखमी मायलेकींची नावे आहेत. पूर्णिमाला हाताला तर ममताला हनुवटीला लागले आहे. या अपघातामध्ये राठी कुटुंबातील एका मुलालाही जबर मुकामार बसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई व उपनगरांतून खोपोली येथील अ‍ॅडलॅब इमॅजिकामध्ये पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात. सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवसांव्यतिरिक्त येथे शाळांमधील विद्यार्थी सहलीसाठी येतात. त्यामुळे अलीकडे खोपोलीचे इमॅजिका हे पर्यटकांचे ‘मौज’स्थान झाले आहे. येथील राइड्स सुरक्षित असल्याने पर्यटकांचे हे मुख्य आकर्षण आहे. मात्र हा अपघात झाल्यामुळे पर्यटकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.