भरधाव वेगाने गाडी चालवून तीन वर्षांच्या चिमुकलीचा बळी घेणारा रौनक देसाई (१९) याची मंगळवारी जामिनावर सुटका झाली. सोमवारी रात्री गोरेगाव पश्चिमेच्या प्रेम नगर येथे ह्युंडाई गाडीने लाडो गुप्ता (३) या चिमुकलीला धडक दिली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता.
काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचा भाचा आणि माजी नगरसेवक समीर देसाई यांचा रौनक हा मुलगा. सोमवारी रात्री जिममधून आपल्या ह्युंडाई गाडीने तो घरी परतत होता. त्यावेळी गोरेगावच्या प्रेमनगर येथे रस्त्यात उभ्या असलेल्या लाडो गुप्ता (३) या मुलीला त्याने जोरदार धडक दिली. लाडो आपल्या मोठय़ा बहिणीसह समोरील मिठाईच्या दुकानात जात होती. रस्ता अरुंद असूनही रौनक भरधाव वेगाने गाडी चालवत होता. निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला. त्याने वाहन चालवताना मद्यपान केले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. प्रसारमाध्यमांना रौनकचे छायाचित्र काढता येऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात आणि न्यायालयातही रौनकभोवती कडे केले होते.
लाडो ही दशरथ गुप्ता या भाजीविक्रेत्याची धाकटी मुलगी होती. दुर्दैव असे की लाडोची आणखी एक मोठी बहीण खुशी हिचाही नुकताच आजारपणाने मृत्यू झाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 19, 2013 3:06 am