चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिकेचा निर्णय

एल्फिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सावध झालेल्या पालिकेने भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पालिका हद्दीत पुलालगतच्या पदपथावर दुतर्फा छप्पर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेल्वे स्थानक परिसरातील पुलालगतच्या पदपथांची पाहणी करण्याचे काम सुरू झाले असून तेथे छपरासाठी जागा कशी उपलब्ध करता येईल याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढय़ा रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी पुलालगतच्या पदपथावर दुतर्फा कायमस्वरूपी छप्पर उभारण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात एल्फिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. मुसळधार पावसाची सर आल्यामुळे भिजू नये म्हणून पदपथावरून जात असलेल्या पादचाऱ्यांनी या पुलावर धाव घेतली. त्याच वेळी रेल्वेतून उतरलेले प्रवासी या पादचारी पुलावरून रस्त्यावर उतरण्याच्या बेतात होते. त्यामुळे पादचारी पुलावर प्रचंड गर्दी झाली आणि पावसापासून बचाव करण्याच्या निमित्ताने धावलेले पादचारी आणि रेल्वेतून उतरलेले प्रवासी यांच्यामध्ये चेंगराचेंगरी झाली.

पावसाळ्यामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे मार्गावरून पालिकेच्या हद्दीत उतरणाऱ्या पादचारी पुलालगत पदपथावर दुतर्फा शक्य तितक्या अंतरापर्यंत छप्पर उभारण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे. पावसाची सर आल्यानंतर रेल्वे स्थानकालगतच्या पदपथावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना रेल्वेच्या पादचारी पुलावर धाव घेण्याऐवजी या छपराखाली थांबता येऊ शकेल. तसेच पाऊस पडू लागताच पादचारी पुलाऐवजी प्रवाशांना पदपथावरील छपराखाली उभे राहता येईल. परिणामी एल्फिन्स्टन-परळ रेल्वे पादचारीपुलावर घडलेल्या चेंगराचेंगरीसारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळणे शक्य होईल. तसेच उन्हाळ्यामध्येही कडक उन्हापासून पादचाऱ्यांचे संरक्षण होऊ शकेल.

रेल्वे मार्गावरील पालिकेच्या हद्दीत उतरणाऱ्या पादचारी पुलालगतच्या पदपथावर किती जागा उपलब्ध आहे, छप्पर उभारण्यात कोणता अडथळा आहे का, किती लांबीचे छप्पर उभारता येऊ शकेल, रेल्वे स्थानकातून किती प्रवासी पादचारी पुलावरून पालिकेच्या हद्दीत उतरतात, सर्वसाधारणपणे किती पादचाऱ्यांची पदपथावर वर्दळ असते याबाबतचा अभ्यास करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी सर्व विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. आयुक्तांचे आदेश मिळताच विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांनी रेल्वे स्थानकालगतच्या परिसराचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. साहाय्यक आयुक्तांनी तातडीने रेल्वे स्थानकालगतच्या परिसरांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी दाटीवाटी, अरुंद पदपथ आणि प्रचंड वाहतूक आदी विविध कारणांमुळे छप्पर उभारण्यास वाव नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र असे असले तरी किमान महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांबाहेर पदपथावर असे छप्पर उभारण्याचा निश्चय पालिकेने केला असून त्या दृष्टीने पालिका अधिकारी चाचपणी करीत आहेत.

गेल्या वर्षी एल्फिन्स्टन-परळ स्थानकांदरम्यानच्या पादचारी पुलावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने पुलालगतच्या पदपथावर दुतर्फा शक्य तितक्या लांबीचे छप्पर उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाऊस पडलाच तर प्रवासी आणि पादचाऱ्यांना पदपथावरील छपराखाली थांबता येईल. त्यामुळे पादचारी पुलावर गर्दी टाळणे शक्य होईल.

अजोय मेहता, पालिका आयुक्त