येत्या शुक्रवारी, म्हणजे २१ डिसेंबर २०१२ या दिवशी जगबुडी होणार असून हा दिवस ‘डूम्स डे’ असल्याची निव्वळ अफवा असून या दिवशी असे काहीही घडणार नाही. त्यामुळे २२ डिसेंबरचा दिवस नेहमीप्रमाणे उजाडणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
ही अफवा पसरायला ‘२०१२’ हा चित्रपट आणि लॉरेन्स ई. जोसेफ यांचे kapocalypse  2012’ हे पुस्तक जबाबदार असल्याचे सांगून सोमण म्हणाले की, २१ डिसेंबर या दिवशी सूर्य आकाशगंगेत विवक्षित ठिकाणी आल्याने जगबुडी होणार असल्याचे सांगितले जाते.
सूर्याने आत्तापर्यंत आकाशगंगेत २० प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे जगबुडीचे हे कारण चुकीचे आहे. १९६२ मध्ये अष्टग्रहीच्या वेळी आणि १९८२ मध्ये बरेच ग्रह सूर्याच्या एका बाजूला आले होते. त्या वेळीही ‘डूम्स डे’ चे भाकीत केले गेले होते. पण तेव्हाही ते खोटे ठरले.त्यामुळे जीवसृष्टीचा अंत होणार ही निव्वळ अफवा आहे, असे सोमण यांनी सांगितले.