मुंबईत दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली असून रस्ते वाहतुकीवर मोठय़ा प्रमाणात ताण पडत आहे. नजीकच्या काळात मुंबईत रोप-वे, जलमार्ग वाहतूक आणि रो-रो सेवेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच्या पहिल्या टप्प्यात शिवडी ते एलिफंटादरम्यान रोप-वे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नौकानयन आणि भूपृष्ठ वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी मुंबईत दिली. तसेच येत्या १ एप्रिपासून भाऊचा धक्का ते मांडवा-नेरुळ रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

भारतीय रेल्वे-बंदर महामंडळातर्फे मुंबईत दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चर्चासत्रात विशेष अतिथी म्हणून गडकरी बोलत होते.

गडकरी म्हणाले, रो-रो सेवेमुळे भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर १७ मिनिटांमध्ये तर नेरुळपर्यंतचे अंतर १४ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. सुमारे ६० ते ७० बसगाडय़ांसह १५ ते २० कंटेनर आणि प्रवासीही या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

ठाणे ते वसई-विरार अशी जल वाहतूकही तीन टप्प्यांत सुरू केली जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाशी लवकरच सामंजस्य करारही केला जाणार आहे. इटली शहरात जल वाहतुकीनेही विमानतळ जोडण्यात आला आहे. नियोजित नवी मुंबई विमानतळही अशा प्रकारे जल वाहतुकीने जोडला गेला तर एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो, असेही गडकरी म्हणाले.