बेदरकार व निष्काळजीपणे गाडी चालवून एखाद्याच्या मृत्यूस वा दुखापतीस कारणीभूत ठरणाऱ्यांसाठी कायद्यात किरकोळ शिक्षेची तरतूद असून त्यात सुधारणा करून ती कठोर करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. तसेच सर्व राज्य सरकारांकडून केंद्र सरकारने त्यावर सूचना-हरकती मागविलेल्या आहेत. परंतु महाराष्ट्राने अद्याप त्यावर काहीच प्रतिसाद न दिल्याने उच्च न्यायालयाने दोन महिन्यांत या प्रस्तावावर केंद्र सरकारला आपले म्हणणे कळविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले.
१२ वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून अभिनेता सलमान खान याने पदपथावर झोपलेल्यांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला होता आणि चारजण गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर पत्रकार निखिल वागळे यांनी जनहित याचिकेद्वारे बेदरकार-निष्काळजीपणे वा मद्यपान करून गाडी चालविणाऱ्यांसाठी कायद्यात किरकोळ शिक्षेची तरतूद असल्याचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला होता. याशिवाय सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नुरूल्ला याच्या कुटुंबियांना आणि जखमींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश सलमानला देण्याची मागणीही केली होती. न्या. अभय ओक आणि न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली असता केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करीत शिक्षा कठोर करण्याच्या प्रस्तावाबाबत सर्व राज्य सरकारांना कळविण्यात येऊन त्यावर सूचना, हरकती, शिफारशी मागविण्यात आल्याचे परंतु महाराष्ट्राकडून  प्रतिसाद आला नसल्याचे सांगण्यात आले.