मुंबई सेंट्रल स्थानकातील घटना; जवानावर कामाचा ताण?

पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल स्थानकात शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास डय़ुटीवर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने आपल्याकडील सव्‍‌र्हिस रायफलने गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.

या जवानाला तातडीने रेल्वेच्याच जगजीवनराम रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचार करण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले. या घटनेचा तपास आता लोहमार्ग पोलीस करत असून रेल्वे सुरक्षा दलानेही अंतर्गत चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या जवानाने शेवटी कोणाशी संपर्क साधला होता, त्याचे काय बोलणे झाले होते आदींची तपासणी सुरू असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या जवानावर कामाचा ताण होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे, तर त्याच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण असावे, असे रेल्वे सुरक्षा दलाचे म्हणणे आहे. त्यामुळे तपास करणारे एक पथक जवानाच्या मूळ गावी रवाना झाले आहे.

हरयाणातील भिवानी येथे राहणारे दलवीर सिंह रेल्वे सुरक्षा दलात मुंबई सेंट्रल येथे कार्यरत होते. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास डय़ुटीवर असलेल्या दलवीर यांनी आपल्याकडील सव्‍‌र्हिस रायफलने तीन वेळा स्वत:वर गोळ्या झाडल्या. त्यांना पाच गोळ्या लागल्यानंतर ते जागीच कोसळले. दलवीर यांच्यासह कार्यरत असलेल्या जवानांनी तातडीने त्यांना रेल्वेच्याच बाबू जगजीवनराम रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला होता. हरयाणामधील भिवानी येथे राहणाऱ्या दलवीर यांच्या पश्चात आईवडील आणि चार बहिणी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नुकताच दलवीर यांचा साखरपुडा झाला होता आणि काही महिन्यांमध्ये लग्न होणार होते. रविवारी शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह त्यांचे वडील राजेंद्र सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांच्यावर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट

दलवीर यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, त्यांना कामावर काही त्रास होता का, घरच्या कुरबुरींमुळे त्यांनी आत्महत्या केली का, अशा सर्वच गोष्टींबाबत तपास सुरू असून लोहमार्ग पोलीस तपास करत आहेत. रेल्वे सुरक्षा दलानेही अंतर्गत चौकशी सुरू केली असून त्यात दलवीर यांचे शेवटचे संभाषण कोणाबरोबर आणि काय झाले होते, याची तपासणी होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.