16 January 2019

News Flash

रेल्वे परिसरातून गर्दुल्ले हटाव मोहीम

सीएसएमटी ते भायखळापर्यंत असणाऱ्या गर्दुल्ल्यांना पूर्णपणे हटविण्यात येणार आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

सीएसएमटी-भायखळादरम्यान रेल्वे सुरक्षा दलाची पथके

रुळांलगतच्या खांबाआड दडून बसलेल्या चोरटय़ाने केलेल्या हल्ल्यात द्रविता सिंग ही तरुणी जबर जखमी झाल्याच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गांभीर्याने पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून सीएसएमटी ते भायखळापर्यंत रुळांजवळ वावरणाऱ्या गर्दुल्ल्यांना पूर्णपणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी १२ जणांचे मिळून दोन पथकही आरपीएफकडून तयार केले जात आहेत.

द्रविता सिंग ही तरुणी ७ फेब्रुवारी रोजी कल्याण स्थानकातून सुटलेल्या महिला विशेष लोकलमधून प्रवास करत असताना रुळाजवळच उभा असणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीने तिच्या डोक्यावर बांबूने हल्ला केला आणि यात ती गाडीतून पडली. त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकल गाडीनेही द्रविताला धडक दिली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपी हा नशा करणारा असल्याचे तपासात पुढे आले. याची दखल घेत मध्य रेल्वे आरपीएफकडून सीएसएमटी ते भायखळा स्थानकापर्यंत गर्दुल्ले हटाव मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सहा जणांचे एक याप्रमाणे दोन पथक आरपीएफचे नेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले. द्रविता सिंगच्या घटनेनंतर सीएसएमटी ते भायखळापर्यंत असणाऱ्या गर्दुल्ल्यांना पूर्णपणे हटविण्यात येणार आहे. त्यासाठी बळाचा वापरही करू, असे भालोदे यांनी सांगितले.

सुरक्षित प्रवासासाठी..

’ फटका गँगचा रुळांजवळ वावर असल्याने लोकलमधून प्रवास करताना डब्यांच्या दरवाजाजवळ उभे राहताना मोबाइलवर बोलू नका किंवा बॅग, पर्स अडकवू नका, असे आवाहन लोकल आणि स्थानकातून करणार.

’ ज्या स्थानकांदरम्यान फटका गँगचा वावर आहे, अशा स्थानकांदरम्यान लोकल गाडय़ांमधून एका आरपीएफ जवानाला पाळत ठेवण्यासाठी नियुक्त करणार. त्या आरपीएफ जवानाला दिसताच आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा अन्य आरपीएफ जवानांचीही मदत मागितली जाईल.

First Published on February 14, 2018 4:30 am

Web Title: rpf remove drug addict from railway premises in mumbai