भावेश नकाते प्रकरणाचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटताच लोकलच्या दारात उभे राहणाऱ्या टोळक्यांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण गुरुवारी रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक ए.के. सिंग यांनी दिले आहे. रोज ठरावीक गाडीने प्रवास न करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच टोळक्यांच्या अरेरावीला तोंड द्यावे लागते. अशा गटांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई केली जाणार आहे.

उपनगरीय रेल्वेने प्रवास करताना सामान्य प्रवाशांसोबत टोळक्यांचे वाद आणि प्रसंगी हाणामारी ही बाब नवीन नाही. मात्र, अनेकवेळा प्रवाशांनी व प्रवासी संघटनानी तक्रार करूनही या टोळक्यांवर कारवाई केली जात नव्हती. अखेर अशा टोळक्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने मध्य आणि हार्बर रेल्वे स्थानकांचे निरीक्षण केले जात आहे. प्रवाशांना लोकलच्या डब्यात शिरताना अडचण निर्माण करणे, दार अडवणे, शिवीगाळ करणे आदीं प्रकार घडत असलेल्या स्थानकांची यादी तयार करण्यात आली आहे. यात सध्या डोंबिवली, कल्याण, बदलापूर तसेच हार्बर मार्गावरील काही स्थानकांचा समावेश असल्याचे ए.के.सिंग यांनी सांगितले. याशिवाय रेल्वे सुरक्षा दलाकडून प्रवाशांना धोका पत्करून प्रवास करू नका असे आवाहन करण्यात येत आहे.

‘आपने क्या किया’ मोहीम सुरू
‘अक्षरा’ संस्थेतर्फे महिला प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत ‘आपने क्या किया’ अभियानाची गुरुवारी सुरुवात करण्यात आली. यात महिलांच्या छेडछाडी आणि लंगिक शोषणाबाबत इतर प्रवाशांनी आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे परिसरात कोणत्या सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे याबाबतच्या सूचना संस्था प्रवाशांकडून घेणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक ए. के. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

आरक्षित डब्यात लहान मुलांचे ‘फुल तिकीट’
रेल्वे अर्थसंकल्पाला दोन महिने शिल्लक असतानाच रेल्वे प्रशासनाने छुप्या पद्धतीच्या भाडेवाढीचा घाट घातला आहे. रेल्वेच्या आरक्षित डब्यांत ५ ते १२ वयोगटातील मुलांसाठी पूर्ण तिकीट आकारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. आसन आरक्षित करायचे असेल तर प्रौढांप्रमाणे भाडे आकाण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी १० एप्रिल २०१६ पासून होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र अनाआरक्षित डब्यात लहान मुलांचे तिकीट अर्धेच आकारले जाणार आहे.