शिवसेनेच्या हिंदुत्वाला रिपब्लिकन पक्षाचा कोणताही आक्षेप नाही आणि आता महायुतीशिवाय दुसऱ्या कोणत्याही राजकीय पर्यायाचा विचार केला जाणार नाही, अशी सुस्पष्ट भूमिका पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडली. महायुतीसोबतच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविल्या जातील, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र शिवाजी महाराजांप्रमाणे शिवसेनेने आपली हिंदुत्वाची भूमिका थोडी व्यापक करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा दिला. हिंदूुत्व हा शिवसेनेचा चेहरा आहे आणि त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, ही भूमिका घेऊनच आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आणि हिंदुत्वाऐवजी सर्व धर्म समभाव अशी शिवशक्ती-भीमशक्तीची भूमिका असावी असा सुरुवातीला आग्रह धरणाऱ्या रामदास आठवले यांनी मात्र आता शिवसेनेचे कडवे हिंदुत्व मान्य केले आहे. शिवसेनेच्या हिंदूत्वाला आमचा विरोध नाही, पण त्याचबरोबर आम्ही आंबेडकरवाद सोडलेला नाही, अशी सारवासारव त्यांनी केली.  
काही झाले तरी शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही, या उद्धव ठाकरे यांच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आठवले म्हणाले की, त्याबद्दल आरपीआयला काहीही आक्षेप नाही. किंबहुना त्यांची हिंदूुत्वाची भूमिका माहित असतानाही आरपीआयने महागाई, भ्रष्टाचार आणि दलितांवरील अत्याचारांच्या विरोधात सक्षम आघाडी उभारण्यासाठी शिवसेना-भाजपशी युती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदूवी स्वराज्याची स्थापना केली. शिवसेनेनेही हिंदूुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व याबरोबरच सर्व जाती-धर्माना सामावून घेणारी व्यापक भूमिका घ्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. आरपीआयने विचारपूर्वक शिवसेनेशी युती केली आहे, राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी महायुती भक्कम असायला हवी, त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या कोणत्याही राजकीय पर्यायाचा विचार करणार नाही, असे आठवले यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपने प्रचारप्रमुखपदी नेमले असले तरी आताच एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करु नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.