रामदास आठवले यांच्या उमेदवारीसाठी आक्रमक

मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लोकसभेची उमेदवारी मिळालीच पाहिजे, असा आक्रम पवित्रा घेत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगी मित्र पक्ष भाजपच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावण्याचे ठरविले आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपने आठवले यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. आठवलेंना डावलून भाजपने अन्य कुणालाही उमेदवारी दिली, रिपब्लिकन कार्यकर्त्यांना वेगळी भूमिका घेणे भाग पडेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

या संदर्भात पुढील दोन-ती दिवसांत ईशान्य मुंबई मतदारसंघातील व शिर्डी मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात आठवले यांना उमेदवारी दिली नाही तर, पुढे काय भूमिका घ्यायची, याची चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी  श्रीकांत भालेराव, प्रा. जीवन जाधव, चिंतामण गांगुर्डे. संजय केदारे, काका कांगुर्डे आदी महाराष्ट्र प्रदेश व मुंबई प्रदेश पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

मागील २०१४ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना व रिपब्लिकन पक्षासह अन्य लहान पक्षांच्या सहभागाने युतीची महायुती करण्यात आली. त्यावेळी जागावाटपात किंवा अन्य राजकीय भूमिका ठरविण्याासाठी घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना सहभागी करुन घेतले जात होते. परंतु या वेळी फक्त भाजप व शिवसेनेचे नेतेच जागावाटपाची चर्चा करतात, मेळावे-सभा घेतात, त्यात कुठेही रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना सहभागी करुन घेतले जात नाही. एक प्रकारे भाजपकडून रिपब्लिकन नेतृत्वाचा अवमान केल्या जात असल्याचा भावना रिपब्लिकन कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु त्यानंतरही भाजपकडून काही हालचाली नाहीत वा चर्चाही नाही. त्यामुळे या मतदारसंघातील रिपब्लिकन कार्यकर्ते नाराज आहेत. ईशान्य मुंबईतून आठवले यांना उमेदवारी दिली नाही, तर रिपब्लिकन कार्यकर्ते भाजपच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावण्याच्या तयारीत आहेत. मुंबई व शिर्डीतील बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाईल.

रिपब्लिकन ऐक्यात आंबेडकर आले तर मंत्रिपद सोडायला तयार – आठवले

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली आहे. रिपब्लिकन ऐक्य होणार असेल आणि त्यात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार असतील तर मंत्रिपद सोडण्याची आपली तयारी आहे, अशी घोषणा आठवले यांनी केली आहे.

गेल्या ३० वर्षांत रिपब्लिकन ऐक्याचे अनेक प्रयोग झाले व फसले. परंतु निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा त्याची चर्चा सुरू केली जाते. या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षातील गटा-तटांना फार महत्त्व न देता, अन्य समाजांतील लहान-सहान पक्ष-संघटनांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. सध्या रिपब्लिकन राजकारणातच नव्हे तर, प्रस्थापित राजकीय पक्षांनाही वंचित आघाडी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. त्याच वेळी आठवले यांनी महाड येथे बुधवारी चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनिदिनानिमित्त आयोजित केलेल्या सभेत पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्यासाठी अन्य नेत्यांना आवाहन केल्याने हा विषय चर्चेत आला आहे.